Adani-Hindenburg Case: अदानी (Adani Group) -हिंडनबर्ग (Hindenburg Report) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं नोव्हेंबर-2023 मध्ये आपला निर्णय राखून ठेवला होता, आता 3 जानेवारीला सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निर्णय देणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी न्यायालयानं सकाळी साडेदहाची वेळ निश्चित केली आहे. म्हणजेच, आजचा बुधवारचा दिवस अदानी समूहासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. 24 नोव्हेंबर रोजी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (DY Chandrachud) यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती आणि त्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. या सुनावणीदरम्यान सेबीच्या तपासाच्या निष्पक्षतेवर आणि तज्ज्ञ समितीच्या सदस्यांवर उपस्थित करण्यात आलेले प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावले होते.


सेबीकडून 'या' प्रकरणाची चौकशी 


सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं की, असं कोणतंही तथ्य नाही, ज्यामुळे सेबीवर (SEBI) शंका घेतली जाऊ शकते. ठोस कारणाशिवाय आम्ही सेबीवर अविश्वास ठेवू शकत नाही, असं न्यायालयानं म्हटलं होतं. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयानं पक्षकारांच्या वकिलांना 27 सप्टेंबरपर्यंत न्यायालयात लेखी युक्तिवाद सादर करण्यास सांगितलं होतं.


दरम्यान, हिंडनबर्गच्या अहवालात झालेल्या खुलाशांच्या संदर्भातील याचिकाकर्त्याच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हिंडनबर्ग अहवालाला सत्य मानता येणार नाही, अशी टिप्पणी केली होती. सर्वोच्च न्यायालयानं पुढे सांगितलं की, हिंडनबर्ग अहवालाची सत्यता पडताळण्याचं कोणतंही साधन नाही, त्यामुळे त्यांनी सेबीला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितलं आहे आणि सेबीनं आपला तपास अहवाल सादर केला आहे.






हिंडनबर्गचा अहवाल नेमका आला कधी? 


महत्त्वाची बाब म्हणजे, 24 जानेवारी 2023 रोजी अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्गनं गौतम अदानींच्या सर्व कंपन्यांबाबत अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये अनेक गंभीर आरोप केले होते. तर अदानी समूहानं हा अहवाल पूर्णपणे खोटा असल्याचं म्हणत हिंडनबर्गनं केलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. हिंडनबर्गचा अहवाल आल्यानंतर अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि त्यांच्या मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं. नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आणि आज अखेर याप्रकरणी निकाल दिला जाणार आहे. 


दरम्यान, अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी नवंवर्षाच्या निमित्तानं त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या व्हिडीओ मेसेजमध्ये म्हटलं आहे की, 2023 हे वर्ष त्यांच्यासाठी आणि त्यांच्या समूहासाठी खूप चढ-उतारांचं ठरलं आहे. हिंडनबर्गच्या बिनबुडाच्या आरोपांमुळे काही काळासाठी काही समस्या निर्माण झाल्या, परंतु समूहानं पुन्हा एकदा सर्व आव्हानांवर मात केली आहे आणि आगामी काळात आपलं ध्येय नक्कीच साध्य करेल. अदानी म्हणाले की, हिंडेनबर्गच्या आरोपांनंतर, आम्ही केवळ बाउन्स बॅक केलं नाही तर रेकॉर्डब्रेक निकाल देखील नोंदवले आणि आमचं सर्वात आव्हानात्मक वर्ष अभूतपूर्व ताकदीनं संपवलं आहे.