कोलकाता : पश्चिम बंगालमधील शाळेच्या पाठ्यपुस्तकातील मोठी चूक समोर आली आहे. दिग्गज धावपटू मिल्खा सिंग म्हणून अभिनेता फरहान अख्तरचा फोटो छापण्यात आला. फरहानने याविषयी ट्वीट करुन चूक सुधारण्यास सांगितलं आहे.


'फ्लाईंग सिख' मिल्खा सिंग यांच्यावर आधारित 'भाग मिल्खा भाग' हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. फरहान अख्तरने या सिनेमात मिल्खा सिंग यांची भूमिका साकारली होती. याच व्यक्तिरेखेचा फोटो पुस्तकात दाखवण्यात आला आहे.

एका ट्विटराईटने चूक निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर फरहानने त्याचा फोटो रीट्वीट करत ही बाब संबंधितांच्या ध्यानात आणली.

'प्रिय पश्चिम बंगालचे शालेय शिक्षण मंत्री, आपल्या शिक्षण मंडळाने एका पाठ्यपुस्तकात मिल्खा सिंगजी यांचा फोटो छापताना अक्षम्य चूक केली आहे. ही पुस्तकं परत मागवून नवीन छापण्याची विनंती प्रकाशकाला करु शकता का? तुमचा विनम्र' असं फरहानने ट्वीट केलं आहे.

फरहानने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनाही टॅग केलं आहे. ओब्रायन यांनी दखल घेत या प्रकरणी लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं आहे. फरहानच्या ट्वीटवर हजारो ट्विटराईटच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.