नवी दिल्ली : CBSE Class X Result 2020 दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ निर्माण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी ट्वीटवरून ही घोषणा केलीय. त्यांच्या या ट्वीटरवरील घोषणेने सीबीएसई दहावीचा निकाल कधी लागणार याविषयीची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालासाठी आता फक्त 24 तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सीबीएसईचा बारावीचा निकाल काल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याविषयी उत्सुकता होती. सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयाला सांगितल्याप्रमाणे 15 जुलै किंवा त्यापूर्वी सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर करणं अपेक्षित होतं. त्यामुळेच कालपासून दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याविषयी चर्चा रंगल्या होत्या. काल बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर दहावीच्या निकालाकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे डोळे लागले होते.
सीबीएसईचा दहावीचा निकालाची तारीख स्वतः केंद्रीय मंत्र्यांनीच जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना उद्या निकाल हातात पडण्याची प्रतिक्षा आहे.
यावर्षी कोरोना व्हायरस साथीमुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात अनेक विषयांचे पेपर झाले असले तरी उत्तर भारतात, मात्र सर्व पेपर झालेले नाहीत. सीबीएसई परीक्षांचा वाद सर्वोच्च न्यायालयाही पोहोचला होता. सीबीएसई बोर्डाने दोन वेळा परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या, मात्र अनेक राज्यांनी त्या तारखांना परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवल्याने सीबीएसईने 1 ते 15 जुलै दरम्यान जाहीर केलेल्या परीक्षा रद्द केल्या होत्या. तसंच सीबीएसईकडून न्यायालयात 15 जुलै किंवा त्यापूर्वी दहावी-बारावीचा निकाल जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं
बारावीप्रमाणेच दहावीचा निकालही फक्त वेबसाईटवर जाहीर होण्याची शक्यता आहे. यावर्षी कोरोना व्हायरसच्या साथीमुळे सीबीएसईकडून पत्रकार परिषद घेतली जाण्याची शक्यता कमीच आहे. तसंच आयसीएसई किंवी सीबीएसई बारावी प्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका, उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आणि मायग्रेशन सर्टिफिकेट डिजिलॉकरमध्ये अपलोड केलं जाण्याची शक्यता आहे.
सीबीएसई दहावीचा निकाल पाहण्यासाठी www.cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर दहावीच्या निकाल पाहण्याच्या लिंकवर क्लिक करा.. ही लिंक नव्या टॅबमध्ये ओपन होईल किंवा नवं पेजवर तुम्ही रिडायरेक्ट व्हाल. या नव्या पेजवर तुम्हाला निकाल पाहण्यासाठी रोल नंबर, स्कूल नंबर, सेंटर नंबर आणि हॉल तिकीट आयडी भरावा लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल उपलब्ध होईल.