ABP CVoter Survey for UP Election 2022 : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या (UP Election 2022) तोंडावर समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसलाय. मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. अपर्णा यादव यांच्या पक्ष प्रवेक्षाचा भाजपला फायदा होईल का? याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळेच एबीपीने सी वोटरच्या साह्याने याबाबतच सर्व्हे केला आहे. मतदाराला काय वाटतेय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. 
 
अपर्णा यादव यांच्या पक्ष प्रवेक्षाचा भाजपला फायदा होईल का? असा प्रश्न एबीपी सी वोटरच्या माध्यमातून लोकांचं मत जाणून घेतलं. यावर 46 टक्के लोकांना भाजपला फायदा होईल, असे वाटतेय. तर 39 टक्के लोकांना फायदा होणार नाही, असे वाटते. तर  15 टक्के लोकांनी माहित नाही असे उत्तर दिलेय.  


भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव काय म्हणाल्या? 
अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच सपावर जोरदार हल्ला चढवलाय. सपा राजवटीत गुंडगिरीला इतके महत्त्व दिले जाते की बहिणी-मुली सुरक्षित नाहीत. संध्याकाळ होताच घरांचे दरवाजे बंद होतात. माझ्यासाठी राष्ट्र हे सर्वात महत्त्वाचे आहे, त्यामुळेच माझ्यावर नेहमीच पंतप्रधानांचा प्रभाव राहिलाय, असं अपर्णा यादव यांनी म्हटलंय. 


दरम्यान, अपर्णा यांनी योगी सरकारच्या विकासकामांचेही अनेकदा कौतूक केलं आहे. कोरोना काळात योगी सरकारनं केलेल्या कामाचं भरभरून कौतूक केलं होतं. "एक सामान्य नागरिक म्हणून मला भाजप सरकारचे अनेक निर्णय आवडले आहेत. भाजप सरकारनं जनहिताचं अनेक चांगले निर्णय घेतले जे योग्यही ठरले आहेत", असं अपर्णा यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटलंय. 


अपर्णा यादव यांच्या भाजप प्रवेशानंतर अखिलेश यांची पहिली प्रतिक्रीया
अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अखिलेश यादव  यांनी पत्रकार परिषदेत या प्रवेशावर आपले मत मांडले.  अखिलेश यादव म्हणाले, "अपर्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आम्हाला आनंद झाला आहे. कारण समाजवादी विचारसरणीचा विस्तार होत आहे. मला आशा आहे की आमची विचारधारा तिथे पोहोचेल आणि संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्या काम करतील.”