नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती सेहवागची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आरती सेहवागने याबाबत दिल्ली आर्थिक गुन्हे शाखेत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.


आरतीची जवळपास साडेचार कोटींची फसवणूक झाली आहे. दिल्लीतील अशोक विहार येथे राहणाऱ्या रोहित कक्कड नावाच्या व्यक्तीसोबत आरतीने पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु केला होता. मात्र त्याने आपलं नाव आणि बनावट सहीच्या आधारे साडेचार कोटींचं कर्ज घेतल्याचा आरोप आरतीने केला आहे.





रोहितने आणि त्याच्या काही मित्रांना आरतीला कोणतीही माहिती न देता दिल्लीतील एका बिल्डर फर्मशी संपर्क साधला. आरती आणि वीरेंद्र सेहवाग व्यवसायात आपल्यासोबत असल्याचं भासवून या सर्वांनी या फर्स सोबत व्यवहार केला. त्यानंतर नाव आणि बनावट सहीच्या गैरवापर करून या सर्वांना या फर्मकडून साडेचार कोटींचं कर्ज घेतलं.


आरती सेहवाने रोहित कक्कडसोबत व्यवसाय सुरु केला होता, त्यावेळी मला माहिती न देता कोणताही परस्पर व्यवहार न करण्याची अट तिने घातली होती. मात्र रोहितने आरती आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या नावाचा गैरवापर करुन त्यांची फसवणूक केली.


आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर आरतीने पोलिसात तक्रार केली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी सर्व आरोपींच्या विरोधात कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.