मुंबई : टीम इंडियाचा शिलेदार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहेत. त्यातच धोनी पुढची इनिंग राजकारणाच्या क्षेत्रात खेळणार असल्याची नवी चर्चा सुरु झाली आहे. धोनी लवकरच भाजपमध्ये दिसेल, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी केल्यामुळे अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत.

'दीर्घ कालावधीपासून आमची धोनीशी चर्चा सुरु आहे. मात्र याबाबतचा निर्णय त्याच्या निवृत्तीनंतरच होईल. धोनी माझ्या परिचयातील आहे. त्याला पक्षात सहभागी करुन घेण्यासाठी माझे प्रयत्न आहेत' असं पासवान म्हणाले.

विशेष म्हणजे, या वर्षाच्या अखेरीस धोनी रहिवासी असलेल्या झारखंडमध्ये विधासनभा निवडणुका होणार आहेत. त्याआधीच धोनीचा भाजपप्रवेश होईल आणि त्याला मुख्यमंत्रिपदासारखी मोठी ऑफरही दिली जाईल, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे गौतम गंभीरप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करुन राजकीय मैदानात धोनी उडी घेणार का, याची चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या 'संपर्क फॉर समर्थन' अभियानाअंतर्गत धोनीची भेट घेतली होती. त्यामुळे धोनीने राजकारणात प्रवेश करायचं ठरवल्यास भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा विचार तो करणार नाही, असं म्हटलं जातं.

धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 साली टी20 विश्वचषक आणि 2011 साली वर्ल्डकप जिंकला आहे. यंदाच्या विश्वचषकात उपान्त्य फेरीत न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर धोनी पुढे काय निर्णय घेणार, याविषयी अनेक तर्क-वितर्क मांडले जात आहेत. त्यात भाजप नेते संजय पासवान यांच्या वक्तव्यामुळे आणखी भर पडली आहे.