नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आम आदमी पार्टी (आप) सध्या महाआघाडी करण्यासाठीचे पर्याय शोधत आहे. काँग्रेस हा त्यंच्यासमोरचा अनुकूल पर्याय आहे. परंतु काँग्रेस आणि आपची फक्त देशाची राजधानी दिल्लीत आघाडी झाली तर आप काँग्रेसला केवळ दोनच जागा देणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.


महाआघाडीबाबत चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला मनीष सिसोदिया, गोपाल राय, संजय सिंह आणि सत्येंद्र कुमार जैन यांच्यासह पक्षातील अन्य नेते उपस्थित होते.

या बैठकीनंतर पक्षाकडून सांगण्यात आले आहे की, आप काँग्रेससोबत चर्चा करण्यासाठी तयार आहे. दोन्ही पक्षांमध्ये आघाडी व्हावी यासाठी आपकडून संजय सिंह यांची प्रतिनिधी नियुक्ती केली आहे. परंतु काँग्रेसकडून अद्याप कोणत्याही प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

दरम्यान आपमधील सुत्रांनी सांगितले की, केवळ दिल्लीत दोन्ही पक्षांनी युती केली तर काँग्रेसला केवळ दोनच जागा दिल्या जातील तर पाच जागांवर आपचा उमेदवार असेल. जर दिल्लीसह हरियाणामध्ये दोन्ही पक्षांनी युती केली तर दिल्लीत आम आदमी पक्ष 4 जागा लढवेल आणि कांग्रेसला तीन जागा देईल. तर हरियाणामध्ये काँग्रेसला सहा जागा, जननायक पार्टीला तीन जागा दिल्या जातील आणि आप केवळ एक जागा लढवेल.