नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या निवडणूक लढणार की नाही? लढणार तर कुठून लढणार? असे अनेक प्रश्न अनेकांना पडले आहे. प्रियांका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून निवडणूक लढतील, असेही अंदाज बांधले जात होते. मात्र प्रियांका गांधी निवडणूक लढणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


प्रियांका गांधी यांच्यावर फेब्रुवारी महिन्यात काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच त्यांना उत्तर प्रदेशच्या प्रभारी बनवण्यात आलं आहे. त्यानंतर प्रियांका गांधींनी निवडणूक लढवावी अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी होती. वाराणसीत तर प्रियांका गांधी यांनी स्वत: कार्यकर्त्यांना मी निवडणूक लढावी की नाही? असा प्रश्न विचारला होता.



त्यानंतर कार्यकर्त्यांना प्रियांका गांधी यांना 'गंगा की बेटी' म्हणत वाराणसीतून निवडणूक लढण्याचं आवाहन केलं होतं. मात्र प्रियांका गांधी यांच्याकडून याबाबत काही स्पष्ट उत्तर मिळालं नाही.


प्रियांका गांधी मोदींना काटे की टक्कर देऊ शकतात


पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतून काँग्रेसनं अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे प्रियांका गांधी यांचं नावाची येथून चर्चा आहे. प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, वाराणसीत प्रियंका गांधी नरेंद्र मोदींना काटे की टक्कर देऊ शकतात. त्यामुळे प्रियंका गांधी वाराणसीतून निवडणूक लढणार अशी रंगली आहे. तर दुसरीकडे प्रियंका गांधी निवडणूक लढणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.