मुंबई : बॉलिवूडमधील आदर्श जोडी समजले जाणारे आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आपल्या 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. किरण राव ही आमिर खानची दुसरी पत्नी होती. या दोघांनी अनेक चित्रपटांच्या प्रोजेक्टवर आणि पाणी फाऊंडेशन तसेच इतरही अनेक प्रोजेक्टवर एकत्रित काम केलं आहे. आम्ही दोघं विभक्त होत असलो तरी एक पालक आणि परिवार म्हणून आम्ही एकत्रित राहू असं या दोघांनी म्हटलंय.
आमिर खान आणि किरण राव यांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, "15 वर्षाच्या सुंदर संसारामध्ये आम्ही सुख, समाधान, आनंदाचे अनेक क्षण अनुभवले. विश्वास, आदर आणि प्रेम यामुळे आमचे संबंध सुंदर होत गेले. आता एक पती आणि पत्नीची जबाबदारी दूर सारुन आम्ही पालक आणि एक परिवाराच्या माध्यमातून आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय. हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता, आता त्याची अंमलबजावणी करण्याची योग्य वेळ आली आहे असं आम्हाला वाटतं."
आपल्या संयुक्त निवेदनात आमिर खान आणि किरण राव पुढे म्हणतात की, "एकमेकांपासून विभक्त होत असलो तरी आम्ही परिवार म्हणून एकच राहणार आहोत. आम्ही दोघेही पहिल्याप्रमाणेच चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रोजेक्टवर एकत्रित काम करणार आहोत. आमच्या या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या आमच्या मित्र परिवाराचे आम्ही आभार मानतो, कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही हा निर्णय घेऊ शकलो नसतो."
आमिर आणि किरण राव ने पुढं म्हटलंय की, "आम्ही आमच्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे, त्यांनी आजवर दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानतो. आमच्या प्रमाणेच, आमच्या हितचिंतकांनीही या घटस्फोटाकडे सहजीवनाचा शेवट झाला अशा अर्थाने पाहू नये. ही एक नवीन सुरुवात आहे असाच अर्थ घ्यावा."
आमिर खान आणि किरण राव हे बॉलिवूडमधील आदर्श कपल म्हणून ओळखलं जायचं. किरण राव ही आमिर खानची दुसरी पत्नी होती.