Chandra Arya :  कॅनडाच्या लिबरल पक्षाने भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांना पक्षनेतृत्वाच्या लढतीतून वगळले आहे. यासोबतच त्यांचे नेपियन येथील तिकीटही रद्द करण्यात आले आहे. भारत सरकारशी त्यांचे जवळचे संबंध असल्याच्या आरोपांदरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्र आर्य गेल्यावर्षी भारत दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. मात्र, कॅनडाचे सरकार आणि लिबरल पक्षाने चंद्र आर्य यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही.

भारतात येण्यापूर्वी पक्षाला माहिती दिली नाही

ग्लोब अँड मेलने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, चंद्र आर्य यांनी या भेटीबाबत कॅनडाच्या सरकारला माहिती दिली नव्हती, त्यावेळी भारत आणि कॅनडाचे संबंध अतिशय तणावपूर्ण अवस्थेतून जात होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस (CSIS) ने कॅनडा सरकारला आर्य यांच्या भारत सरकारसोबतच्या कथित जवळच्या संबंधांची माहिती दिली होती. चंद्र आर्य यांनी 22 जून 2024 रोजी कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या स्मरणार्थ मौन बाळगल्याबद्दल ट्रूडो सरकारवर टीका केली होती.

आर्य म्हणाले,  खलिस्तानींना विरोध केल्याने तिकीट रद्द केले

दरम्यान, भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य म्हणाले, माझे भारताशी जवळचे संबंध असल्याने माझे तिकीट कापले गेले नाही. खासदार असल्याने मी अनेक मुत्सद्दी आणि राष्ट्रप्रमुखांना भेटत असतो. अशा कोणत्याही सभेसाठी त्यांनी कधीही सरकारची परवानगी घेतली नाही. आर्य म्हणाले की, लिबरल पार्टी आणि नेपियन यांच्या नेतृत्वातून त्यांना काढून टाकण्याचे कारण म्हणजे त्यांचा खलिस्तानी चळवळीला सततचा विरोध आहे. आर्य कॅनडातील खलिस्तानी तत्वांविरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. 

खलिस्तानी पन्नूने ट्रुडो यांच्याकडे तक्रार केली होती

आर्य यांनी कॅनडातील खलिस्तानी तत्वांविरोधात जोरदार आवाज उठवला आहे. आर्या यांच्या टीकेमुळे चिडलेल्या खलिस्तानी गटांनी त्यांना यापूर्वीही लक्ष्य केले आहे. ऑक्टोबरमध्ये अमेरिकास्थित खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना आर्य यांच्याविरोधात कारवाई करण्याची विनंती केली होती. चंद्रा हे आधी जस्टिन ट्रुडोच्या जवळचे मानले जात होते, पण खलिस्तानी दहशतवाद आणि अतिरेक्यावर ट्रुडो यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आर्य त्यांचे कट्टर विरोधक बनले. तत्पूर्वी, या निर्णयाची माहिती देताना आर्याने ट्विटरवर लिहिले की, "मला लिबरल पक्षाकडून कळवण्यात आले आहे की नेपियनमधील आगामी फेडरल निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून माझे नामांकन रद्द करण्यात आले आहे. ही बातमी निराशाजनक आहे. पण त्यामुळे नेपियनच्या लोकांची सेवा केल्याचा मला असलेला अभिमान कमी होणार नाही. याआधी चंद्र आर्य यांनी 9 जानेवारी रोजी उमेदवारी जाहीर केली होती. मात्र तरीही पक्षाने त्यांची उमेदवारी रद्द केली होती. त्यासाठी पक्षाने त्यांना 'अपात्र' घोषित केले होते.

2006 मध्ये कर्नाटकातून कॅनडाला गेले

चंद्र आर्य हे मूळचे कर्नाटकातील तुमकुरु येथील सिरा तालुक्यातील आहेत. 2006 मध्ये ते कॅनडामध्ये स्थायिक झाले. आर्य यांनी कौसली इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, धारवाड येथून एमबीए केले आहे. कॅनडामध्ये आल्यानंतर त्यांनी ओटावा येथे गुंतवणूक सल्लागार म्हणून काम सुरू केले आणि नंतर सहा वर्षे संरक्षण कंपनीत कार्यकारी म्हणून काम केले. राजकारणात येण्यापूर्वी ते इंडो-कॅनडा ओटावा बिझनेस चेंबरचे अध्यक्ष होते. 2015 मध्ये त्यांनी पहिल्यांदा फेडरल निवडणूक लढवली आणि निवडणूक जिंकून संसदेत पोहोचले. 2019 आणि 2021 मध्ये ते पुन्हा खासदार झाले. आर्य यांनी अनेकदा खलिस्तानी आणि अतिरेकी कारवायांवर टीका केली आहे. हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले आणि धार्मिक उन्मादाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या