लखनौ : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात एक अजब प्रकरण समोर आलं आहे. इथल्या हिमांशु शुक्ला नावाच्या व्यक्तीला बालपणी एका दलित मुलाला थोबाडीत मारल्याच्या आरोपात 22 वर्षांनी शिक्षा झाली आहे. ही घटना घडली त्यावेळी हिमांशु शुक्ला केवळ 9 वर्षांचा होता.


आपल्या सातवा बुजुर्ग गावातील कल्लू (तेव्हा वय 9 वर्ष) नावाच्या मुलाला थोबाडीत मारली होती. पण आता त्या घटनेच्या सुमारे दोन दशकानंतर हिमांशुला शिक्षा मिळाल्याने सगळेच आश्चर्य व्यक्त करत आहेत. ज्युवेनाईल कोर्टाने हिमांशुला अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत (एससी/एसटी अॅक्ट) दोषी ठरवलं आहे.

1995 मधील घटना 2017 मध्ये शिक्षा
1995 मध्ये घडलेल्या या घटनेबाबत हिमांशु सांगतो की, "मी कोणत्या गोष्टीमुळे त्या मुलाल मारलं होतं हे मला आठवत नाही. पण त्या दिवशी माझ्या हातून मोठी चूक झाली होती, असं मला कायम वाटतं. घटनेच्या दिवशी पोलिसांनी मला घरातून अटक केली होती. पण दुसऱ्याच दिवशी मला सोडून दिलं होतं."

यानंतर सुमारे 22 वर्षांपर्यंत काहीच घडलं नाही. आता हिमांशु 31 वर्षांचा झाला असून आता त्याला या प्रकरणात शिक्षा झाली आहे. ज्युवेनाईल कोर्टाने त्याला दोषी ठरवलं आहे. त्याचसोबत एक महिन्याच्या आत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका सामाजिक आरोग्य केंद्रात सफाई कामगार म्हणून एक महिना काम करण्याची शिक्षा मिळाली आहे.

सीएचसीमध्ये 25 जानेवारीपर्यंत साफसफाईची शिक्षा
पोवायन सीएचसीमध्ये सोमवारपासून हिमांशुच्या शिक्षेला सुरुवात झाली आहे. कोर्टाने 15 डिसेंबरला शिक्षा सुनावली. "सीएससीमध्ये 25 जानेवारीपर्यंत मी सफाई कामगार म्हणून काम करणार आहे," असं हिमांशु म्हणाला.

"माझा एका गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला होता. सुविधांपासून वंचित असलेल्या मुलांप्रमाणेच माझं आयुष्य गेलं आहे. त्यावेळी मला दलितचा अर्थही माहित नव्हता, असं हिमांशुने सांगितलं.

दु:स्वप्नाप्रमाणे घटनेचा विसर
"काळाप्रमाणे दु:स्वप्नाप्रमाणे मी ही घटना विसरलो होतो. मी ड्रायव्हिंग शिकलो, नोकरीला सुरुवात केली, लग्न केलं आणि मला दोन मुलं आहेत. सगळं व्यवस्थित सुरु होतं. पण 2011 ला मला कोर्टाकडून समन मिळालं. माझ्याविरोधात भारतीय दंडविधान कलम 323 (जाणीवपूर्वक मारहाण करणं) आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत (एससी/एसटी अॅक्ट) गुन्हा दाखल झाल्याचा उल्लेख त्यात होता.

माझी दिवसाची कमाई 200 ते 250 रुपये आहे. त्यामुळे कोर्टात हजर राहण्यासाठी मला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे," असंही हिमांशु म्हणाला.

कुटुंबाचा खर्च चालवण्यात अडचणी
सल्ला सहा वर्षानंतर एकाने मला दिला की, "मी माझी चूक स्वीकारायला हवी आणि मी तेच केलं." आता हिमांशुला शिक्षेच्या स्वरुपात सीएचसीमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत नोकरी करावी लागते. परंतु यामुळे कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याचं हिमांशु सांगतो.

वकिलाची फी भरण्यााठी मी 40 हजार रुपयांचं कर्ज घेतल्याचं हिमांशु शुक्लाने सांगितलं. सीएचसी अधीक्षक डॉ. डी आर मनु यांनी सांगितलं की, "हिमांशु शुक्ला अशिक्षित असल्याने आम्ही त्याला रुग्णालयाच्या स्वच्छतेचं काम दिलं आहे."