Bengaluru : घटस्फोटासाठी न्यायालयात केलेली याचिका मागे घेण्यासाठी आणि पत्नीला परत आणण्यासाठी सासरी गेलेल्या पतीने स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नीने नकार दिल्यानंतर त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये ही घटना घडली. पतीने पत्नीच्या घरासमोर आत्महत्या केली. न्यूज एजन्सी IANS च्या रिपोर्टनुसार, मृत व्यक्तीच्या पत्नीने कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती, ज्यामुळे दोघांमध्ये वाद झाला होता. पतीने पत्नीला घटस्फोटाची याचिका मागे घेण्यास सांगितले, मात्र ती ते मान्य करत नव्हती.


घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली होती


पोलिसांनी सांगितले की, मृत पतीचे नाव 39 वर्षीय मंजुनाथ असून तो कुनिगल शहरातील रहिवासी आहे. तो कॅब मालक होता. 2013 मध्ये तिच्या लग्नानंतर दोघेही बेंगळुरूमध्ये एका फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते. त्यांना 9 वर्षांचा मुलगाही आहे. दोघांमधील मतभेदांमुळे मंजुनाथ दोन वर्षांपासून वेगळे राहू लागला आणि दोघांनी घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली होती.


पतीने सासरच्या घरी जाऊन स्वतःला पेटवून घेतले


कोर्टातून घटस्फोटाची याचिका मागे घेण्यासाठी मंजुनाथ पत्नीला समजवण्यासाठी तिच्या घरी आला होता. त्यांच्या पत्नीने हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर पतीने स्वत:वर पेट्रोल ओतून पत्नीच्या घरासमोर स्वत:ला पेटवून घेतले, यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यासाठी मंजुनाथच्या पालकांनी पत्नीला जबाबदार धरले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


कर्नाटकात धक्कादायक घटनांची मालिका सुरुच


दुसरीकडे, बेंगळुरू येथील एआय अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येचे प्रकरण अजूनही संपले नसतानाच आता हे एक प्रकरण समोर आले आहे. अतुलने पत्नी निकिता सिंघानियावर छळ केल्याचा आणि घटस्फोटासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला होता. या सगळ्या दरम्यान, 14 डिसेंबर 2024 रोजी बेंगळुरूमधील एका पोलीस अधिकाऱ्याच्या आत्महत्येचे प्रकरण देखील समोर आले होते, ज्यामध्ये त्याच्यावर पत्नी आणि तिच्या कुटुंबाचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता.


इतर महत्वाच्या बातम्या