Amul Milk Price : अमूलने आपल्या दुधाच्या किंमती कमी केल्या आहेत. तसेच दुग्धजन्य पदार्थांच्या किमती देखील कमी करण्याची घोषणा केली आहे. 26 जानेवारीपूर्वी जनतेसाठी हा मोठा दिलासा आहे. कंपनीने आपल्या तीन वेगवेगळ्या दुधाच्या किंमत कमी केल्या आहेत. यामध्ये अमूल गोल्ड, अमूल टी स्पेशल आणि अमूल फ्रेश यांचा समावेश आहे. या सर्व दुधाच्या किंमतीत 1 रुपयांची घसरण झाली आहे.


किती रुपयांना मिळणार 1 लिटर दूध?


पूर्वी अमूल गोल्ड दूध पूर्वी 66 रुपये लिटर होते, ते आता 65 रुपये लिटरने मिळणार आहे. तर अमूल टी स्पेशलची दुधाची किंमत ही प्रतिलिटर 63 रुपये होती, ती आता 62 रुपये करण्यात आली आहे. तर अमूल फ्रेश 54 रुपयांवरून 53 रुपये करण्यात आला आहे. अमूलने दुधाचे दर कमी करण्याबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. पण, बाजारातील स्पर्धा आणि ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनीने हे पाऊल उचलले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय दूध उत्पादन खर्च कमी झाल्यानंतर अमूलने हा निर्णय घेतला असावा.


ग्राहकांना दिलासा


दरम्यान, दुधाच्या दर कपातीमुळे ग्राहकांना दूध खरेदी करताना दिलासा मिळणार आहे. विशेषत: जे कुटुंब नियमितपणे दूध घेतात. दुधाच्या वाढत्या दरामुळे अनेकांना आधीच फटका बसला होता. आता अमूलच्या ग्राहकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.