Linkedin Workplace Culture Report: भारतातील 10 पैकी 9 (87%) विविध व्यावसायिक कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की, कामाच्या ठिकाणी भावना शेअर केल्याने उत्पादक वातावरण आणि आपलेपणाची भावना निर्माण होते. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या लिंक्डइनच्या अहवालात ही माहिती सांगण्यात आली आहे. या अभ्यासात विविध कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या 2,188 भारतीयांनी सहभाग घेतला होता. ज्यातून ही माहिती समोर आली आहे. 


या अभ्यासात असे दिसून आले आहे की, भारतातील चारपैकी तीन (76 टक्के) कर्मचारी कोरोना संकटानंतर कामावर परतल्यावर त्यांना त्यांची भावना शेअर करणे अधिक सोयीस्कर वाटते. हा बदल LinkedIn वर देखील दिसत आहे. या प्लॅटफॉर्मवर सार्वजनिक संवादात 28 टक्के वाढ झाली असल्याचे अहवालात सांगणात येत आहे. तसेच सुमारे दोन तृतीयांश (63 टक्के) कर्मचारी आपल्या भावना व्यक्त करताना बॉससमोर रडले असल्याचं कबूल केलं आहे. यातील एक तृतीयांश (32 टक्के) लोकांनी एकापेक्षा जास्त वेळा असं केलं असल्याचं देखील सांगितलं आहे. 


लिंक्डइनचे इंडिया कंट्री मॅनेजर आशुतोष गुप्ता यांनी सांगितले की, गेली दोन वर्षे कठीण होती. याकाळात लोकांना हे जाणवलं आहे की, कामाच्या ठिकाणी एकमेकांशी भावना शेअर करून ते अधिक स्पष्ट राहू शकतात. यातच भारतातील 10 पैकी सात (70 टक्के) कर्मचाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, कामाच्या ठिकाणी भावना शेअर केल्याचे तोटे देखील आहेत. भारतातील एक चतुर्थांश कर्मचाऱ्यांना भावना शेअर केल्यास आपण अधिक कमकुवत दिसू अशी चिंता वाटते.


भारतातील पाच पैकी चार (79 टक्के) कर्मचारी सहमत आहेत की, कामाच्या ठिकाणी जेव्हा महिला त्यांच्या भावना शेअर करतात तेव्हा पुरुषांपेक्षा जास्त त्यावर लक्ष दिलं जातं. अहवालात सांगण्यात आले आहे की, केवळ 20 टक्के कर्मचारी (58-60 वयोगटातील) कामाच्या ठिकाणी आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडतात आणि त्यांच्या भावनाही ते सहज शेअर करतात.