India Corona Updates : देशातील कोरोना रुग्णांची संख्या (Coronavirus) पुन्हा एकदा वाढली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत 1,051 रुग्णांची वाढ झाली आहे. देशात शुक्रवारी 7219 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. त्याआधी गुरुवारी दिवसभरात 6 हजार 168 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत (Coronavirus Cases Today) सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाढती रुग्णसंख्या चिंतेच कारण आहे. 


गेल्या 24 तासांत 9 हजार 651 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त


देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 651 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. देशातील उपचाराधीन असलेल्या कोरोना रुग्णांची संख्याही घटली आहे. सध्या देशात 56 हजार 745 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 5 लाख 27 हजार 965 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात नोंद झालेल्यांपैकी सर्वाधिक रुग्ण सौम्य लक्षणे असणारे आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 213 कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. 






मुंबईत शुक्रवारी 402 रुग्णांची नोंद


मुंबईत गेल्या 24 तासांत 402 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होतानाचे चित्र दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शुक्रवारी 676 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,22,378 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.0 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,705 झाली आहे. सध्या मुंबईत 3,414 रुग्ण आहेत. 


महाराष्ट्रात सहा कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद


राज्यात शुक्रवारी 1258 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या 24 तासांत एकूण 1942 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात सहा कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,44,923 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.06 टक्के इतकं झालं आहे.