नवी दिल्ली :  दलजिंदर कौर या आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने वयाच्या 70 व्या वर्षी आई झाल्या आहेत. दलजिंदर यांनी मुलाला जन्म दिला असून बाळ-बाळंतिण सुखरुप असल्याची माहिती आहे.

 
आयव्हीएफद्वारे दलजिंदर यांना मातृत्व लाभण्याबाबत डॉक्टरांनी साशंकता व्यक्त केली होती. मात्र काही आवश्यक चाचण्यांनंतर हे शक्य झालं. आपलं आयुष्य पूर्ण झाल्याचं सांगत दलजिंदर यांनी पहिल्यांदा आई होण्यासाठी वय उलटून गेलं नसल्याचं म्हटलं.

 
हरियाणामध्ये राहणाऱ्या दलजिंदर यांचे पती मोहिंदर सिंग गिल 79 वर्षांचे आहेत. दोन वर्षांच्या ट्रीटमेंटनंतर गेल्या महिन्यात या दाम्पत्याला बाळ झालं. 46 वर्षांच्या संसारात त्यांनी बाळ होण्याच्या आशा गमावल्या होत्या.

 
'देवाने आमची प्रार्थना ऐकली. माझं आयुष्य पूर्ण झालं. मीच बाळाची काळजी घेते. माझ्यात एक वेगळाच उत्साह संचारला आहे. माझे पतीही खूप काळजी घेतात, आणि शक्य तितकी मदत करतात' असं दलजिंदर कौर सांगतात.

 
'मी जेव्हा आयव्हीएफ तंत्रज्ञानाची जाहिरात पाहिली, तेव्हा माझ्याही मनात आशेची पालवी फुटली. मला मातृत्वाची ओढ लागली होती, त्यामुळे आम्ही एकदा प्रयत्न करायचं ठरवलं.' अशा शब्दात त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.