नवी दिल्ली : पोलिस ठाण्याचं नाव ऐकल्यावर तुमच्या मनात सर्वप्रथम काय येतं? एकदम टकाटक ऑफिस, कडक वर्दीतील अधिकारी, समोर पोलिस गाडी आणि वायरलेसवर बोलणारे कर्मचारी... पण या देशातील काही पोलिस स्टेशन अजूनही जुन्या काळातीलच आहेत, त्यांच्याकडे सोई-सुविधा नाहीत, इतकंच काय तर त्यांच्याकडे गाडी नाही आणि टेलिफोन कनेक्शनही नाही असं जर तुम्हाला सांगितलं तर? पण हे आम्ही सांगत नाही, केंद्र सरकारने लोकसभेत ही माहिती दिली आहे. 


देशात 63 पोलिस ठाणी अशी आहेत ज्यांच्याकडे स्वतःचं कोणतेही वाहन नाही. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत ही माहिती दिली. एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, देशात 628 पोलीस ठाणी अशी आहेत ज्यांना टेलिफोन कनेक्शन नाही. त्याचबरोबर 285 पोलिस ठाण्यांमध्ये वायरलेस सेट किंवा मोबाईल फोन नाहीत. 63 ठाण्यांकडे तर स्वतःच वाहनही नाही.


नित्यानंद राय यांनी सभागृहात सांगितले की, देशात सुमारे 17,535 पोलिस स्टेशन कार्यरत आहेत. त्यापैकी काही ठाण्यांची ही अशी अवस्था आहे. 


 




जुन्या चित्रपटांमध्ये काही पोलीस ठाणी अशी दाखवली जायची की त्यांच्याकडे कोणतीही सुविधा नाही, ते अगदी दुर्गम भागात आहेत. त्यांच्याकडे गाडी नाही, किंवा शस्त्रास्त्रही नाहीत. मात्र आज देशभरातील बहुतांश पोलिस ठाण्यांमध्ये परिस्थिती बदलली आहे. अनेक पोलिस ठाण्यांमध्ये आता आधुनिक वाहने आणि सर्व सुविधा उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत आज वाहनाशिवाय किंवा मोबाईल फोनशिवाय पोलीस ठाणे अस्तित्वात येऊ शकते याची कल्पनाही करणे कठीण आहे. पण केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनंतर अजूनही काही ठिकाणी तीच परिस्थिती असल्याचं स्पष्ट झालंय. 


दरम्यान, मंगळवारी विरोधकांनी संसदेत मोठा गोंधळ घातल्यानंतर सभागृह तहकूब करावं लागलं. लंडनमध्ये भारताची प्रतिमा डागाळल्याबद्दल भाजप नेत्यांनी राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली. तर दुसरीकडे काँग्रेसने अदानींच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.


पंतप्रधान मोदींनी वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली


संसदेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, पीयूष गोयल, नरेंद्र सिंह तोमर, किरेन रिजिजू, अनुराग ठाकूर आणि नितीन गडकरी यांच्यासह प्रमुख मंत्री उपस्थित होते.


ही बातमी वाचा: