Fire In Andhra Pradesh Factory : आंध्र प्रदेशातील एलुरु जिल्ह्यातील एका रासायनिक कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत 6 जणांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी नेण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
गॅस गळतीमुळे स्फोट
मसुनुरु मंडलातील अक्कीरेड्डी गुडेम येथील पोरस केमिकल फॅक्टरीत गॅस गळतीमुळे रिअॅक्टरचा स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या दरम्यान कारखान्यात काम करणाऱ्या 6 जणांचा मृत्यू झाला, कारखान्याला लागलेल्या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आणि रुग्णालयात नेत असताना 1 जणाचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. सुमारे 11 जखमींना विजयवाडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी 6 जण बिहारचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व मृत कर्मचारी बिहारचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातावेळी कारखान्यात सुमारे 17 कामगार उपस्थित होते.
सीएम जगन रेड्डी आणि राज्यपालांनी शोक व्यक्त केला
या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासोबतच किरकोळ जखमींना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जगन रेड्डी म्हणाले की, अधिकाऱ्यांना जखमींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेमागील कारणांची सविस्तर चौकशी करण्यास सांगितले आहे. राज्याचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. यासोबतच या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करण्यात आला आहे.