5G Service Launch : दोन वर्षांमध्ये देशभरात 5G चं जाळं उभारण्याचं सरकारचं लक्ष्य असल्याचं केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. दिल्लीमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. 5G सेवा लाँच करण्याची तयारी सुरु असल्याचं या कार्यक्रमावेळी वैष्णव यांनी सांगितलं. 


 भारतात लवकरच 5G सेवेला सुरुवात होणार आहे. पुढील दोन वर्षांमध्ये संपूर्ण भारतामध्ये 5G सेवा सुरु करण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य आहे, असे दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. त्याशिवाय ऑक्टोबरमध्ये देशात 5G सेवेला सुरुवात होणार असल्याचेही संकेत यावेळी त्यांनी दिले. 






 केंद्र सरकारनं ऑगस्टमध्ये दूरसंचार कंपन्यांना स्पेक्ट्रमसाठी लिलावाची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारनं 5 जी सेवांसाठी रोलआऊटच्या तयारी करण्यास सांगितलं. 5 जी सेवा सुरु करण्याचा अखेरच्या टप्प्यामध्ये भारत पोहचला आहे. लवकरच भारतात 5जी सेवा सुरु होणार आहे. 







रिलायन्स जिओनं दिवाळीमध्ये 5 जी सेवा लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये रिलायन्स दिवाळीमध्ये 5 जी सेवा सुरु करणार आहे. त्यानंतर डिसेंबर 2023 पर्यंत देशभरातील प्रत्येकशहरात आणि गाव-खेड्यात 5 जी सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. 
 
3G आणि 4G पेक्षा 5G मध्ये वेगळं काय?
5 जी पाचव्या पिढीचा मोबाईल नेटवर्क आहे, जो अतिशय वेगानं डेटा प्रसारित करतो. 3G आणि 4G च्या तुलनेत 5G चा वेग अतिशय जास्त आहे. 4G च्या तुलनेत 5 जी दहा पटीनं वेगानं सेवा देणार आहे. या सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण एन्ड टू एन्ड नेटवर्क भारतात तयार करण्यात आलं आहे.


लिलावात कोणी कोणी भाग घेतला?
स्पेक्ट्रम लिलावात चार प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी भाग घेतला होता. यामध्ये रिलायन्स जिओ, अदानी ग्रुप, भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांचा सहभाग होता.  


लिलावातून सरकारला किती महसूल मिळला ?
5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव नुकताच पार पडला. यामधून केंद्र सरकारला 1.50 लाख रुपयांची बोली लागली. लिलावातून सरकारला सुरुवातीला 80,000-90,000 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.  


दरम्यान, 5G सेवा सुरू झाल्यानंतर या तंत्रज्ञानामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. याशिवाय जागतिक स्तरावरही भारताला याचा मोठा लाभ मिळणार आहे. स्वदेशी 5G तंत्रज्ञान स्वदेशी 5G खाजगी कंपन्यांना जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्यास मदत करेल.