Corona Update : गेल्या दोन-अडीच वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटाने जगभरात थैमान घातले आहे. फुब्रुवारीपासून यातून तोडीफार सुटका होत असल्याचे दिसत असतानाच राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत 461 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 20 फेब्रुवारीनंतर दिल्लीत सर्वाधिक रुग्ण आढळले असल्याचे सांगण्यात येत आहे. 20 फेब्रुवारी रोजी दिल्लीत 570 कोरोना रूग्ण आढळले होते.
दिल्लीत कोरोना संसर्गाचा दर 5.33 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, कोरोनाचा हा संसर्ग दर 31 जानेवारीनंतर सर्वाधिक आहे. 31 जानेवारी रोजी कोरोना विषाणूचा संसर्ग दर 6.20 टक्के होता. त्यानंतर आता कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे अधिकाऱ्यांचीही चिंता वाढली आहे.
दिल्लीत सध्या सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 1262 वर पोहोचली आहे. 5 मार्च नंतरची ही संख्या सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, 5 मार्च रोजी दिल्लीत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1350 होती. दरम्यान, दिल्लीतील वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल सरकारने सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
देशात गेल्या 24 तासांत 975 नवे कोरोना रुग्ण
देशात गेल्या 24 तासांत 975 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. काल 949 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाला असून 6 जणांचा मृत्यू झाला. नवीन मृत्यूंसह देशातील मृतांची संख्या 5 लाख 21 हजार 747 वर पोहोचली आहे. सध्या देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 366 इतकी झाली आहे.
दरम्यान, देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 186 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. गुरुवारी दिवसभरात देशात 6 लाख 89 हजार 724 कोरोना लसी देण्यात आल्या. भारतात आतापर्यंत 186 कोटी 38 लाख 31 हजार 723 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या