नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यवस्थने (GDP) 4 ट्रिलियनचा टप्पा (4 Trillion Indian Economy) गाठल्याची बातमी निराधार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या संबंधित लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने हे वृत्त फेटाळलं आहे. या वृत्ताला अर्थमंत्रालय किंवा भारत सरकारने अद्याप कोणताही दुजोरा दिला नव्हता. त्यानंतर आता सरकारच्या वतीनेच यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
देशाचा GDP (सकल राष्ट्रीय उत्पादन) चार ट्रिलियन डॉलर पार करून पुढे गेल्याच्या बातम्या नोव्हेंबर महिन्यात प्रसिद्ध झाल्या होत्या. एका केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांसह अनेक भाजप नेत्यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले होते. त्यानंतर सरकारच्या वतीने मात्र अद्याप याविषयीची कोणतीही अधिकृत टिप्पणी केली गेली नव्हती. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना अखेर केंद्र सरकारने हे वृत्त फेटाळले आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी केलं होतं अभिनंदन
नोव्हेंबर महिन्यात देशाचा GDP चार ट्रिलियन डॉलरवर गेल्याच्या बातम्या समाजमाध्यमात प्रसिद्ध झाल्या होत्या. एका व्हायरल स्क्रीनशॉटवरून अनेकांनी या बातमीला प्रसिद्धी दिली होती. वित्त मंत्रालयाने मात्र देशाचा GDP चार ट्रिलियन डॉलरवर गेल्याच्या बातम्यांना दुजोरा दिलेला नव्हता. मात्र देशाच्या GDP विषयीच्या या बातमीमुळे अनेक भाजप समर्थकांनी केंद्र सरकारचे अभिनंदनही केले होते. त्यामध्ये अनेक भाजप नेत्यांचीही समावेश होता. केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनीही X पोस्ट करून सरकारचे अभिनंदन केले होते. देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांनीही एक्स पोस्ट करून देशाचे अभिनंदन केले होते.
संबंधित व्हायरल फोटो स्वतःच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध करणाऱ्या भाजपच्या नेत्यांमध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, आंध्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष डी. पुरंदेश्वरी यांचा समावेश होता.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान माकपचे तामिळनाडूतील खासदार एस. वेंकटेशन यांनी देशाच्या जीडीपी विषयीचा प्रश्न केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाला विचारला होता. वेंकटेशन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने म्हटले आहे की, "देशाचा GDP सरकारकडून फक्त भारतीय चलनात म्हणजेच रुपयांमध्ये मोजला जातो. मागील अर्थी वर्ष 2022-2023 चा GDP 272.41 लाख कोटी इतका होता.
चालू आर्थिक वर्षात कोणताही अंदाज सरकारने व्यक्त केलेला नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF), आर्थिक सहकार्य आणि विकास संस्था (OECD) , जागतिक बँक इ.संस्था भारतासह इतर देशांचा GDP चे अंदाज अमेरिकन डॉलर्समध्ये प्रकाशित करतात." त्यानुसार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने ऑक्टोबर 2023 मध्ये व्यक्त केलेले अंदाज खालीलप्रमाणे असल्याचे केंद्र सरकारने नमूद केले आहे,
- 2023 - 3.71 ट्रिलियन डॉलर
- 2024- 4.11 ट्रिलियन डॉलर
- 2025- 4.51 ट्रिलियन डॉलर
- 2026- 4.95 ट्रिलियन डॉलर
- 2027- 5.53 ट्रिलियन डॉलर
- 2028 - 5.94 ट्रिलियन डॉलर
केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाने कोणताही अंदाज चालू आर्थिक वर्षाच्या GDP संदर्भात व्यक्त केलेला नाही, असे नमूद केले आहे.
चार ट्रिलियन डॉलर्स जीडीपी झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर केंद्र सरकारकडून पहिल्यांदाच याविषयी अधिकृत खुलासा करण्यात आला आहे. त्यानुसार भारताचा GDP अद्याप चार ट्रिलियन डॉलर्सवर गेलेला नाही. त्यामुळे संबंधित स्क्रीनशॉटमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. GDP ला आर्थिक सक्रियेतेचे परिमाण समजले जाते. एखाद्या देशाची आर्थिक प्रगती आणि विकास तपासताना फक्त GDP च्या आकड्यांचाच आधार घ्यावा की अन्य घटकही तपासावेत, याविषयी अर्थातज्ञांमध्ये मतभेद आहेत. तरीही GDP चा आकडा देशाची आर्थिक स्थिती ठरवताना महत्वाची भूमिका बजावतो, यावर जगभरात सर्वसाधारण एकमत असल्याचे दिसून येते.
ही बातमी वाचा: