ओ.पी सैनी कोण आहेत?
टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील हायप्रोफाईल आरोपींची सुटका करणारे सीबीआयचे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सैनी यांनी आत्तापर्यंत अनेक महत्वाच्या प्रकरणांवर काम करत अनेकांना तुरुगांत धाडलंय.
63 वर्षांच्या सैनी यांचं नाव न्यायव्यवस्थेमध्ये अतियश आदराने घेतलं जातं. अभ्यासू , मृदभाषी म्हणून सर्वत्र परिचित आहेत. मूळचे हरियाणाचे असलेले सैनी 1981 मध्ये दिल्लीत आले आणि पोलिस सब इन्स्पेक्टर झाले.
पोलिस दलातील 6 वर्षाच्या नोकरीनंतर त्यांनी न्यायिक व्यवस्थेत जाण्याचा निर्णय घेतला. 1987 मध्ये मॅजिस्ट्रेटची परीक्षा उत्तीर्ण होणारे ते एकमेव विद्यार्थी होते.
2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने टूजी घोटाळ्यासाठी विशेष न्यायालय नेमण्याचे आदेश दिले, तेव्हा सैनी यांचं नाव एकमताने सरकारला सुचवण्यात आलं. टूजी घोटाळ्याआधीही सैनी यांनी अनेक बड्या धेंड्यांना दणका दिलाय.
राष्ट्रकुल घोटाळ्यात सुरेश कलमाडींचे निकटवर्तीय ललितकुमार भानोत, व्ही.के वर्मा, कुक रेड्डी, प्रवीण बक्षी यांच्यासारख्या दिग्गजांना सैनी यांनी घरचा रस्ता दाखवला.
नॅशनल अॅल्युमिलीअम कंपनी म्हणजेच नेल्को लाच प्रकरणातही तत्कालिन चेअरमन ए. के. श्रीवास्तव यांचा जामीन नाकारला. टूजी घोटाळ्यातही कनिमोळीचा जामीन त्यांनी अनेकदा नाकारला होता. आणखी एका प्रकरणात भारती एअरटेलचे सुनिल मित्तल आणि हचिसन मॅक्सचे असीम घोष यांनाही साक्षीसाठी पाचारण करण्यात आलं.
लाल किल्याजवळील पोलीस चौकीवरील हल्ल्याप्रकरणी सर्व आरोपींना आजन्म कारावास सुनावला. जनतेच्या घामाच्या पैशांचा मलिदा लाटणाऱ्या अनेकांना ओ.पी सैनी यांनी जन्माची अद्दल घडवली आहे. त्यामुळे टू जी घोटाळ्यावर सैनी यांनी दिलेल्या निकालावर शंका व्यक्त करायला कुणालाही सध्यातरी जागा नाही.