22 November In History: इतिहासात आजचा दिवस हा अमेरिकेला हादरा देणारा ठरला. आजच्याच दिवशी 1963 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तसेच आजच्याच दिवशी 1968 साली मद्रास राज्याचं नाव बदलण्यात आलं आणि ते तामिळनाडू असं करण्यात आलं. 


808- थॉमस कुक अॅन्ड सन्सचा संस्थापक थॉमस कुकचा जन्म 


जगातील सर्वात जुन्या ट्रव्हल कंपन्यांपैकी एक असलेल्या थॉमस कुक अॅन्ड सन्सचा (Thomas Cook & Son) संस्थापक थॉमस कुक याचा जन्म 22 नोव्हेंबर 1808 रोजी ब्रिटनमध्ये झाला. ट्रव्हलिंगमध्ये पॅकेज टूरची संकल्पना आणणाऱ्या आणि ती लोकप्रिय करणाऱ्या व्यक्तींपैकी थॉमस कुक हा एक होता. गेल्या काही वर्षांमध्ये ही कंपनी तोट्यात आल्याने कंपनीच्या ब्रिटनमधील शाखेला टाळं ठोकण्यात आलं. पण भारतातील शाखा मात्र सुरू असून मुंबईमध्ये त्याचं मुख्यालय आहे. 


1963- अमेरिकन अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची हत्या


अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष  जॉन एफ केनेडी (John F. Kennedy) यांची 22 नोव्हेंबर 1963 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेमउळे जागतिक महासत्ता असलेली अमेरिका चांगलीच हादरली. जॉन एफ केनेडी हे अमेरिकेचे 1961 ते 1963 या दरम्यान राष्ट्राध्यक्ष होते. केनेडी यांना ली हार्वे ओस्वाल्ड या व्यक्तीने दोन वेळा गोळ्या मारल्या. जॉन एफ केनेडी डॅलस, टेक्सासमधून जात असताना ही घटना घडली होती. राष्ट्राध्यक्षांचा मारेकरी असलेल्या ओस्वाल्डला दोन दिवसांनी एका नाईट क्लबच्या मालकाने गोळ्या घातल्या आणि त्याची हत्या केली. राष्ट्राध्यक्ष केनेडी यांच्या हत्येमागे एक मोठा कट असल्याचा अनेकांचा विश्वास होता, पण काहीही सिद्ध होऊ शकले नाही


1968- मद्रास राज्याचं नाव बदलून तामिळनाडू ठेवण्यात आलं


स्वातंत्र्यपूर्व भारतातील दक्षिणेकडील प्रांत म्हणजे मद्रास प्रांत (Madras Presidency) होय. ब्रिटिशांच्या काळात मद्रास प्रेसिडेन्सी असलेल्या प्रदेशात आंध्र प्रदेशाचा किनारपट्टी भाग, मलबार, कर्नाटक आणि तामिळनाडू यांचा समावेश होत होता. 1953 साली या भाषिक आधारावर आंध्रची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर या प्रदेशातून 1956 साली केरळ आणि म्हैसूर म्हणजे आताचं कर्नाटकची निर्मिती करण्यात आली. उरलेला प्रांत हा मद्रास राज्य या नावाने ओळखला जायचा. आजच्याच दिवशी म्हणजे 22 नोव्हेंबर 1968 साली मद्रास राज्याचं नाव बदलण्यात आलं आणि तामिळनाडू (Tamil Nadu) असं ठेवण्यात आलं. नंतरच्या काळात म्हणजे 1996 साली मद्रास शहराचं नावदेखील चेन्नई (Chennai) असं करण्यात आलं. 


1986- ब्लेड रनर ऑस्कर पिस्टोरियस याचा जन्म 


ब्लेड रनर म्हणून प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा अपंग धावपटू ऑस्कर पिस्टोरियस (Oscar Pistorius) याचा आजच्या दिवशी, 22 नोव्हेंबर 1986 रोजी जन्म झाला. पॅरालिम्पिकमध्ये ऑस्कर पिस्टोरियसने सहा सुवर्णपदकं मिळवली आहेत. त्यानंतर तो 2012 साली लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारा पहिला अपंग खेळाडू ठरला. ऑस्कर पिस्टोरियसवर 2013 साली त्याच्या गर्लफ्रेण्डच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आणि त्याला सहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. 


1997- डायना हेडन मिस वर्ल्ड


डायना हेडन (Diana Hayden) हिची ओळख भारतीय विश्वसुंदरी आणि मॉडेल अशी आहे. फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये फेमिना मिस इंडिया वर्ल्डचा मुकुट जिंकणाऱ्या डायनाने त्याच वर्षी म्हणजे 22 नोव्हेंबर 1997 रोजी सेशेल्समध्ये पार पडलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत विजेतेपद पटकावलं. मिस वर्ल्ड ही स्पर्धा जिंकणारी डायना हेडन ही तिसरी भारतीय ठरली. त्या आधी रिटा फारिया आणि ऐश्वर्या राय यांनी हा खिताब पटकावला होता. 


2000- पाकिस्तान आणि इराणवर अमेरिकेचे निर्बंध


अणवस्त्रांचा विकास कार्यक्रम सुरू ठेवणाऱ्या पाकिस्तान आणि इराणवर अमेरिकेने 22 नोव्हेंबर 2000 रोजी निर्बंध लादले. या दोन्ही देशांमध्ये छुप्या पद्धतीने अणवस्त्र विकासाचा कार्यक्रम सुरू असल्याचा युरोपियन देशांचा संशय होता. त्यातून पाकिस्तानने अणवस्त्र विकास तंत्रज्ञान इराणला दिल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर अमेरिकेने आणि युरोपियन देशांनी या दोन्ही देशांवर निर्बंध लादले. 


2005- अॅंजेला मर्केल जर्मनीच्या पहिल्या महिला चॅंन्सेलर


अॅंजेला मर्केल (Angela Merkel) यांची 22 नोव्हेंबर 2005 रोजी जर्मनीच्या चॅन्सेलरपदी निवड करण्यात आली होती. अॅंजेला मर्केल या जर्मनीतील ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन पक्षाच्या नेत्या आहेत. 2005 ते 2021 अशा प्रदीर्घ कालावधीसाठी त्यांनी जर्मनीचे नेतृत्व केलं. चॅन्सेलरपदावर निवड झालेल्या त्या पहिल्याच महिला होत्या. फिजिकल केमेस्ट्रीमध्ये डॉक्टरकीची पदवी मिळवलेल्या मर्केल यांची 1990 मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्नमधून जर्मनीच्या संसदेवर पहिल्यांदा निवड झाली. त्यानंतर त्यांनी जर्मन सरकारमध्ये महिला व बाल मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय अशी खाती सांभाळली. 2005 सालच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजय मिळवून त्या  चॅन्सेलरपदावर बसल्या. मर्केल या युरोपियन युनियनमधील सर्वात प्रभावशाली व्यक्ती मानल्या जायच्या. 2009 साली भारत सरकारने त्यांना जवाहरलाल नेहरू पुरस्काराने सन्मानित केलं. 


ही बातमी वाचा: