राम रहीमला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली, अशी माहिती होती. मात्र दोन बलात्कार प्रकरणांमध्ये प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे राम रहीमला एकूण 20 वर्षांची शिक्षा सीबीआयच्या न्यायालयाने सुनावली आहे.
साध्वी बलात्कार प्रकरणी 25 ऑगस्टला राम रहीमला दोषी ठरवण्यात आलं होतं. राम रहीमवर बलात्कार (कलम 376), धमकावणे (कलम 506) आणि कलम 511 अन्वये शिक्षा सुनावण्यात आली आहे.
काय झालं कोर्टात?
न्यायाधीश जगदीप सिंग यांनी सुरुवातीला दोन्ही पक्षांना युक्तीवादासाठी दहा-दहा मिनिटांचा वेळ दिला होता. त्यानंतर बाबा राम रहीमला कोर्टरुममध्ये बोलावण्यात आलं. यावेळी कोर्टरुममध्ये सीबीआयचे दोघे जण, बचाव पक्षातर्फे तिघे जण, दोन स्टाफ सदस्य आणि न्यायाधीश जगदीप सिंह इतक्याच व्यक्ती उपस्थित होत्या.
बाबा राम रहीमने न्यायाधीशांकडे दयेची याचना केली. कोर्टरुममध्ये बाबा राम रहीम हात जोडून उभा राहिला होता. त्यावेळी बाबाला रडू कोसळलं.
राम रहीम समाजसेवक आहे, त्यांना कमीत कमी शिक्षा द्या, अशी मागणी त्याच्या वकिलांनी न्यायाधीशांकडे केली. आम्ही लोकांच्या भल्यासाठी काम केलं, स्वच्छता मोहीम, रक्तदान यासारख्या समाजसेवी योजना राबवल्या, अशा कामांचा उल्लेख करत राम रहीमला माफ करण्याची विनवणीही वकिलांनी कोर्टाकडे केली.
अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश जगदीप सिंग यांनी निकालाचं वाचन सुरु केलं. साध्वीवरील बलात्कार प्रकरणी ‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख बाबा राम रहीमला दहा वर्षांची शिक्षा कोर्टाने सुनावली.
शिक्षा सुनावल्यानंतर बाबा राम रहीमला मोठा धक्का बसला. त्याच मनस्थितीत तो कोर्टातील जमिनीवर बसून रडत बसला होता. जेल वॉर्डन आणि स्टाफने त्याला चापट मारुन उठवलं.
राम रहीमच्या वैद्यकीय तपासणीत प्रकृती सामान्य असल्याचा अहवाल आला. त्यानंतर राम रहीमला जेलमध्ये नेण्यात आलं. बाबाला कैद्यांचा युनिफॉर्म देऊन जेलमधील कोणत्या सेलमध्ये त्याची रवानगी करायची, हे ठरवण्यात येईल.
राम रहीमकडे कोणते पर्याय?
राम रहीमचे वकील हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करु शकतात. जाणकारांच्या मते, अशा प्रकरणांमध्ये जामीन मिळणं कठीण मानलं जातं.
राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला तरी हायकोर्ट सीबीआयची बाजू ऐकून घेतल्याशिवाय जामीन मंजूर करणार नाही. सीबीआयला नोटीस पाठवून उत्तर मागवलं जाईल. त्यानंतर पुढील सुनावणी होईल म्हणजेच ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत राम रहीमचा मुक्काम तुरुंगात असेल.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
एप्रिल 2002 : 2002 मध्ये साध्वींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप बाबा गुरमीत राम रहीमवर आहेत. साध्वीने एप्रिल 2002 मध्ये तत्कालिन मीडिया, पंजाब-हरियाणा हायकोर्टाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून राम रहीमवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर हायकोर्टाने 24 सप्टेंबर 2002 रोजी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.
मे 2002 : तक्रारीच्या पत्राची पडताळणी केल्यानंतर तपासाची जबाबदारी सिरसा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांवर सोपवली होती.
डिसेंबर 2002 : तक्रार योग्य असल्याचं सिद्ध झाल्यानंतर राम रहीमविरोधात कलम 376, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
डिसेंबर 2003 : ह्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपास अधिकारी सतीश डागर यांनी चौकशी सुरु केली आणि 2005-2006 मध्ये लैंगिक शोषण झालेल्या साध्वीला शोधून काढलं.
जुलै 2007 : सीबीआयने प्रकरणाचा पूर्ण तपास करुन अंबाला सीबीआय कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. अंबालावरुन हे प्रकरण पंचकुला सीबीआय कोर्टात ट्रान्सफर केलं. आरोपपत्रानुसार डेरामध्ये 1999 आणि 2001 मध्ये आणखी काही साध्वींचंही लैंगिक शोषण झालं होतं. पण त्यांचा पत्ता लागला नाही.
ऑगस्ट 2008 : प्रकरणाचा खटला सुरु झाला आणि डेरा प्रमुख राम रहीमविरोधात आरोप निश्चित करण्यात आले.
2011 ते 2016 : प्रकरणाचा खटला चालला. डेरा प्रमुख राम रहीमकडून वकील सातत्याने बाजू लढवत राहिले.
जुलै 2016 : खटल्याच्या सुनावणीदरम्यान 52 साक्षीदारांचा जबाब नोंदवला. यामध्ये 15 सरकारकडून आणि 37 बचाव पक्षाचे होते.
जून 2017 : कोर्टाने डेरा प्रमुख बाबा राम रहीमच्या परदेश प्रवासावर बंदी घातली.
25 जुलै 2017 : सीबीआय कोर्टाने या प्रकरणात दररोज सुनावणी करण्याचे निर्देश दिले, जेणेकरुन लवकरच निकाल लावता येईल.
17 ऑगस्ट 2017 : दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपला आणि निकालासाठी 25 ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली.
25 ऑगस्ट 2017 : बाबा राम रहीमला बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं.
28 ऑगस्ट 2017 : 2002 मधील साध्वी बलात्कार प्रकरणी ‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख बाबा राम रहीमला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
संबंधित बातम्या :