नवी दिल्ली : अवयवदान करण्याचं आवाहन सातत्यानं करण्यात येतं. विविध रुग्णालयं, आरोग्य संस्था, स्वयंसेवी संस्थांनी आजवर त्यांच्या अनेक उपक्रमांतून अवयव दानाचं आवाहन केलं आहे. देशात हजारो रुग्ण असे आहेत, त्यांना जीवन जगण्यासाठी अवयवांची गरज आहे. कुणाला यकृत, किडनी, हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड आणि डोळे यांची आवश्यकता आहे. मात्र आपल्याकडे मेंदू मृत पश्चात असलेल्या अवयव दानाबाबतात असलेल्या उदासीनतेमुळे आपल्याकडे अनेक रुग्ण प्रतीक्षा यादीवर आहेत. अवयवनदानाची संधी आपल्याला केव्हा मिळेल याच्याच प्रतीक्षेत ते आहेत.


एकिकडे ही परिस्थिती असतानाच दिल्ली येथील जोडप्याने आपल्या 20 महिन्याच्या मुलीला डॉक्टरांनी मेंदूमृत (ब्रेन डेड ) जाहीर केले तेव्हा त्यांनी आपल्या मुलीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आपल्या मुलीचे हृदय, किडनी, यकृत, आणि डोळे दान केले. त्यांच्या या परोपकारी निर्णयामुळे आज पाच जणांना ते अवयव मिळाले असून त्यांच्या जीवनात जगण्याची नवीन उमेद निर्माण झाली आहे.


८ रोजी, दिल्ली येथे रोहिणी या भागात राहणाऱ्या आशिष कुमार यांची 1 वर्ष 8 महिन्याची मुलगी धनिष्ठा ही बाल्कनीमध्ये खेळत असताना पहिल्या मजल्यावरून खाली पडली. त्या अपघातानंतर तिच्या कुटुंबीयांनी तात्काळ तिला जवळच्या सर गंगाराम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही धनिष्ठाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही. 11 जानेवारी रोजी डॉक्टरांनी धनिष्ठा हीला मेंदूमृत म्हणून घोषित केले. धनिष्ठावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी या परिस्थितीबाबत तिच्या वडिलांना कळविले.


'ए एन आय' वृत्तसंस्थेशी बोलताना धनिष्ठाचे वडील आशिष कुमार यांनी सांगितले की, "धनिष्ठाला उपचार देणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, माझी मुलगी मेंदू मृत झाली असून तिचे तब्येत पूर्ववत होणे शक्य नाही. धनिष्ठा हिच्यावर उपचार सुरु असताना रुग्णलयात आम्ही अनेक पालकांना भेटलो होतो. त्यांच्या मुलांना अवयवाची गरज होती. मी डॉक्टरांना विचारले की,मी माझे मुलीचे अवयव दान करू शकतो का ? डॉक्टरांनी मला होकार दिला. त्यावेळी मी आणि माझ्या बायकोने अवयव दान करण्याचा एकत्रित निर्णय घेतला. आमची आज मुलगी गेली असली तरी ती तिच्या अवयवांच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनातून एक प्रकारे जगणारच आहे."


याप्रकरणी सर गंगाराम हॉस्पिटलचे अध्यक्ष यांनी सांगितले की, "आपल्या देशात अवयवदानाचे प्रमाण अत्यल्प आहे. अनेक जण अवयव मिळविण्यासाठी प्रतीक्षा यादीवर अवलंबून आहेत. या सगळ्यात या जोडप्यांची आपल्या लहान मुलीचे अवयव दान करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भविष्यात अवयव दाना बाबत सकारत्मक जनजागृती होईल असा मला विश्वास आहे. त्यांच्या या निर्णयामुळे, किडनी एक तरुणाला तर हृदय आणि यकृत लहान बाळांना देण्यात आले आहे आणि डोळे नेत्र पेढीत ठेवण्यात आले आहेत.''


तरुण व्यक्तीचे अवयव दान नातेवाईकपणे देत असतात. मात्र लहान मुलांच्या बाबतीत सहसा त्याचे पालक अवयवदानाकरिता तयार होत नाही. त्यामुळे लहाने मुले जे अवयवाच्या  प्रतीक्षेत असतात त्यांना लवकर अवयव मिळत नाहीत. दिल्ली येथील आशिष कुमार यांनी आपल्या मुलीचे हे अवयव दान करून काही मुलांच्या आयुष्यातील आनंद द्विगुणित केला आहे.