मुंबई : लहानपणापासून चंद्रावर स्वारी करण्याची स्वप्नं तुम्ही-आम्ही पाहिली असतात, मात्र ते प्रत्यक्षात उतरवणं प्रत्येकालाच जमत नाही. चेन्नईतल्या 18 वर्षांच्या एका विद्यार्थ्याने मात्र हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं पावलं टाकली आहेत. कौतुकाची गोष्ट म्हणजे 'नासा'ने त्याच्या प्रोजेक्टला कौतुकाची थाप दिली आहे.
नासा एम्स स्पेस सेटलमेंट कॉन्टेस्ट 2017 मध्ये चेन्नईच्या साई किरण पी या 18 वर्षीय विद्यार्थ्याने भाग घेतला होता. या स्पर्धेत त्याने पृथ्वीपासून चंद्रापर्यंत एलिव्हेटरचा प्रस्ताव मांडला. साई किरणच्या या प्रस्तावाला स्पर्धेत दुसरं पारितोषिक मिळालं.
सॅन होजे स्टेट युनिव्हर्सिटीने नॅशनल स्पेस सोसायटीच्या सोबतीने ही स्पर्धा आयोजित केली होती. जगभरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली होती. चंद्रावर मानवी वस्तीसाठी प्रस्ताव मांडणं, ही या स्पर्धेची थीम होती.
साई किरणने 2013 मध्ये या प्रकल्पावर काम करायला सुरुवात केली. 'कनेक्टिंग मून, अर्थ अँड स्पेस' या विषयावर त्याने सविस्तर प्रबंध लिहिला. चंद्र आणि पृथ्वीला जोडणाऱ्या एका उद्वाहकाच्या सहाय्याने मानवी वाहतुकीची कल्पना त्याने मांडली. गुरुत्वाकर्षण हा मुख्य मुद्दा असल्याचंही त्याने नमूद केलं.
विशेष म्हणजे चंद्रावरील मनोरंजन, शासन व्यवस्था, शेती यांचाही विचार त्याने प्रबंधात मांडला आहे. 40 हजार किलोमीटर उंचीवर हा एलिव्हेटर बांधण्याचा प्रस्ताव आहे.