नवी दिल्ली : नोटाबंदीला 15 महिने झाले आहेत, पण अद्याप 500 आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटांची मोजणी पूर्ण झालेली नसल्याचे स्पष्टीकरण रिझर्व बँकेने दिलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीला उत्तर देताना रिझर्व बँकेने ही माहिती दिली.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, “500 आणि 1000 रुपयाच्या नोटांची नेमकी आणि प्रमाणित माहिती तपासण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. त्यानंतरच नोटाबंदीनंतर किती नोटा परत आल्या याची नेमकी आणि विश्वासार्ह माहिती देता येईल.” तसेच, या व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, अंदाजित आकड्यात तफावत राहू शकते, असंही बँकेनं म्हटलं आहे.
30 जून 2017 पर्यंत जमा झालेल्या नोटांची संख्या 15.28 लाख कोटी रुपये होती. त्यामुळे त्याच्या मोजणीची प्रक्रिया वेगाने सुरु असल्याचंही बँकेने स्पष्ट केलं.
सध्या रिझर्व बँकेकडून जुन्या नोटांची मोजणी करण्यासाठी 59 करन्सी व्हेरिफिकेशन अँड प्रोसेसिंग मशीन (CVPS) चा वापर करण्यात येत आहे. यात कमर्शियल बँकांजवळील आठ मशिन, तर सात मशिन हे भाडेतत्वावर घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. पण या सर्व मशिन कुठे कुठे कार्यरत आहेत, याची माहिती रिझर्व बँकेने दिलेली नाही.
दरम्यान, गेल्या वर्षी 30 ऑगस्ट रोजी रिझर्व बँकेने आपला वार्षिक अहवाल सादर केला. या अहवालात नोटाबंदीनंतर आत्तापर्यंत 15.28 लाख कोटी बँकेकडे परत आल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच ही रक्कम एकूण रकमेच्या 99 टक्के म्हणजे, 16 हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत होतं.