On This Day In History 14 February : 14 फेब्रुवारीचा दिवस जम्मू-काश्मीरमधील एका दुःखद घटनेने इतिहासात नोंदला गेला आहे. पाच वर्षे उलटून गेली पण त्या घटनेच्या जखमा अजूनही तशाच आहेत. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर स्फोटकांनी भरलेले वाहन घुसवून स्फोट घडवून आणला. त्यात 40 जवान शहीद झाले होते. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या दिवसाची इतिहासात आणखी एका कारणाने नोंद आहे. 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो.तिसर्‍या शतकात रोमच्या एका क्रूर सम्राटाने प्रेमीयुगुलांवर अत्याचार केले तेव्हा धर्मगुरू व्हॅलेंटाईनने सम्राटाची आज्ञा मोडून प्रेमाचा संदेश दिला म्हणून त्याला कैद करून 14 फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात आली असे म्हणतात. प्रेमासाठी बलिदान देणाऱ्या या संताच्या स्मरणार्थ दरवर्षी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. 
 


 1876 : अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला 


3 मार्च 1847 रोजी एडिनबर्ग स्कॉटलंड येथे अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा जन्म झाला. त्यांनी टेलिफोनचा शोध लावला. 14 फेब्रुवारी 1876 रोजी त्यांनी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला आणि 7 मार्च 1876 रोजी त्यांना हे पेटंट मिळाले. टेलिफोन पेटंट हे जगातील सर्वात वादग्रस्त पेटंटपैकी एक असल्याचे म्हटले जाते. कारण जेव्हा बेलने टेलिफोनच्या शोधाची घोषणा केली तेव्हा 600 हून अधिक लोकांनी त्यावर दावा केला होता. यापैकी पाच जण तर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात गेले. पण शेवटी बेल यांचाच विजय झाला.  


1933 : अभिनेत्री मधुबाला यांची जयंती   


आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री मधुबालाच जन्म 14 फेब्रुवारी 1933 रोझी झाला. मधुबाला हिचे खरे नाव मुमताज जहान बेगम नहलवी असे होते. तिला बेबी मुमताज म्हणूनही ती ओळखले जात असे.  बाबुराव पटेल आणि डॉ. सुशीलाराणी पटेल या दांपत्याचा मधुबालावर विशेष लोभ होता. डॉ. सुशीलाराणी पटेल यांनीच बेबी मुमताजचे 'मधुबाला'असे नामकरण केले होते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. 23 फेब्रुवारी 1969 रोजी त्यांचे निधन झाले. 


1952 : भारतीय जनता पक्षाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची जयंती 


सुषमा स्वराज यांजा जन्म 14 फेब्रुवारी 1952 रोजी झाला. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या वकील होत्या. शिवाय भारतीय जनता पार्टीच्या एक वरिष्ठ नेत्या होत्या. त्या 26 मे 2014 ते 2019 पर्यंत भारताच्या परराष्ट्र मंत्री होत्या. इंदिरा गांधीनंतर हे पद घेणाऱ्या त्या दुसऱ्या महिला होत्या. त्या संसदेच्या सदस्य म्हणून सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या होत्या. 1977 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी त्या हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या.  त्यांनी 13 ऑक्टोबर 1998 पासून 3 डिसेंबर 1998 पर्यंत दिल्लीच्या पाचव्या मुख्यमंत्री म्हणून काम केले. 6 ऑगस्ट 2019 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. 


1974 : रशियन लेखक अलेक्झांडर सोल्झेनित्सिन यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावला. 


रशियन लेखक अलेक्झांडर सोल्झेनित्सिन यांच्यावर देश सोडल्यानंतर एका दिवसात देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला. अलेक्झांडर इसाविच सोल्शेनित्सिन यांचा जन्म 11 डिसेंबर 1918 रोजी झाला. सोलझेनित्सिन हे रशियन भाषेतील 20 व्या शतकातील महत्त्वाचे लेखक होते. सोल्शेनित्सिन यांनी अनेक कादंबऱ्या, कविता आणि कथा रचल्या. 1970 ला त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. 
 


1989 : ईराणच्या आयातोल्ला खोमेनी यांनी ब्रिटिश लेखक सलमान रश्दी यांच्या हत्येचा फतवा काढला 
इराणचे धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी यांनी भारतीय वंशाचे ब्रिटीश लेखक सलमान रश्दी यांच्या 'सॅटनिक व्हर्सेस' या पुस्तकाविरुद्ध ईशनिंदा म्हणून फतवा काढला. या फतव्यातून रश्दी यांची हत्या करणाऱ्यास बक्षीस जाहीर केले होते.


1990 : इंडियन एअरलाइन्सचे विमानाच्या अपघातात 97 जणांचा मृत्यू 


बंगळुरूमधील गोल्फ कोर्सवर आजच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारी 1990 रोजी इंडियन एअरलाइन्सचे विमान कोसळले होते. वैमानिकानला विमानाच्या धावपट्टीचा अंदान न आल्यामुळे हा अपघात झाला होता. या अपघातात विमानातील 146 पैकी 97 जणांचा मृत्यू झाला होता.


2005 : यूट्यूब' नावाची वेब साइट नोंदणीकृत केली


स्टीव्ह चेन, चॅड हर्ले आणि जावेद करीम यांनी व्हिडिओ शेअर करण्यासाठी 'यूट्यूब' नावाची वेब साइट नोंदणीकृत केली. या यूट्यूब एवढे लोकप्रिय झाले आहे की आज दरमहा सुमारे एक अब्ज लोक त्याचा वापर करतात. अनेक लोक व्हिडीओ बनवून याच यूट्यूबमधून लाखो रूपये कमावत आहेत. 


2005 : लेबनीजचे माजी पंतप्रधान रफिक हरीरी यांचा बेरूतमध्ये कार बॉम्बस्फोटात मृत्यू  
 
लेबनीजचे माजी पंतप्रधान रफिक हरीरी यांचा 14 फेब्रुवारी 2005 रोजी स्फोटकांनी भरलेल्या ट्रकने धडक दिल्याने मृत्यू झाला. या आत्मघातकी हल्ल्यात त्यांच्यासोबत इतर 21 जणांचाही मृत्यू झाला होता. हरिरी हे लेबनॉनचे सर्वात लोकप्रिय सुन्नी मुस्लिम नेते होते. 


2019 : पुलवामा हल्ल्यात 40 जवानांचा मृत्यू 


भारताच्या इतिहासात 14 फेब्रुवारी हा काळा दिवस मानला जातो. कारण याच दिवशी 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून सुमारे 2500 जवानांना घेऊन सीआरपीएफचा ताफा 78 बसमधून जात होता. त्या दिवशीही रस्त्यावर सामान्य वाहतूक होती. सीआरपीएफचा ताफा पुलवामाला पोहोचला त्यावेळी रस्त्याच्या वाजूने येणारी एक कार सीआरपीएफच्या ताफ्यासोबत जाणाऱ्या वाहनावर आदळली. कार ताफ्याला धडकताच तिचा स्फोट झाला आणि या प्राणघातक हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Rajya Sabha Election 2024 : 'वर्षा'वर आज रात्रीच महायुतीचे उमेदवार निश्चित होणार? शिंदे, फडणवीस, अजित पवार, बावनकुळे बैठकीला पोहोचले