नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील महिलांच्या असुरक्षितेतचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. 2012 मध्ये देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया प्रकरणानंतरही परिस्थिती जैसे थे आहे. दिल्लीत केवळ लहान मुलांचंच नाही, तर दररोज महिलांचंही अपहरण होत आहे.


दिल्लीत दररोज सरासरी 11 महिलांचं अपहरण होतं, अशी माहिती एका एनजीओकडून दाखल केलेल्या आरटीआयमधून समोर आली आहे. 2016 मध्ये शहरात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणं महिलांशी संबंधीत होती, असं प्रजा फाऊंडेशनने गुन्हे आणि पोलीस यावर तयार करण्यात आलेल्या अहवालात म्हटलं आहे.

गेल्या वर्षी 6 हजार 707 अपहरणाच्या प्रकरणांची नोंद झाली. त्यापैकी महिलांच्या अपहरणाची 4 हजार 101 प्रकरणं होती. अपहरणाची 75 टक्के प्रकरणं महिलांसंबंधी होती, असं एनजीओने म्हटलं आहे.

साल 2015 मध्ये 7 हजार 937 प्रकरणांची नोंद करण्यात आली. यापैकी 792 प्रकरणं अल्पवयीन मुलांच्या अपहरणासंबंधीत, तर एकूण 52.78 टक्के महिला पीडित होत्या. धक्कादायक बाब म्हणजे दररोज सरासरी दोन अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण होत असल्याचं वास्तवही एनजीओच्या अहवालातून समोर आलं आहे.

राजधानी दिल्लीत मुलं सुरक्षित आहेत का?

दिल्लीत मुलं खरंच सुरक्षित आहेत का, असा सवाल आता प्रजा फाऊंडेशनच्या अहवालानंतर उपस्थित झाला आहे. कारण गेल्या वर्षी बलात्काराच्या एकूण 2 हजार 181 प्रकरणांची नोंद करण्यात आली. त्यापैकी 977 प्रकरणं पोक्सो म्हणजे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2015 मध्ये बलात्काराच्या 2 हजार 338 प्रकरणांची नोंद झाली. ज्यापैकी 1 हजार 149 पीडित अल्पवयीन होते.

गेल्या वर्षी दिल्लीत महिलांची छेडछाड करण्याची सर्वात जास्त प्रकरणं घडली, असंही प्रजा फाऊंडेशनने म्हटलं आहे. 2016 मध्ये छेडछाडीची 3 हजार 969 प्रकरणं घडली. ज्यापैकी 590 प्रकरणं दक्षिण दिल्लीतील होती. 2015 मध्ये दक्षिण जिल्ह्यामध्ये छेडछाडीची 485 प्रकरणं समोर आली होती. तर 2014 मध्ये हा आकडा 862 एवढा होता. 2015 च्या तुलनेत गेल्या वर्षात सेंट्रल दिल्ली, आऊटर दिल्ली, नवी दिल्ली, उत्तर दिली, दक्षिण दिल्ली आणि दक्षिण-पूर्व जिल्ह्यांमध्ये छेडछाडीच्या घटना वाढल्याचं वास्तवही प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून समोर आलं आहे. 2016 मध्ये छेडछाडीची 11 प्रकरणं दिल्ली विमानतळावरही नोंद करण्यात आली.