नवी दिल्ली : गुजरात निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखांची आज अखेर घोषणा झाली आहे. 15 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान संसदेचं हिवाळी अधिवेशन होणार आहे.


गुजरातचं दोन्ही टप्प्यातलं मतदान 14 डिसेंबरला पूर्ण झाल्यानंतरच हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. हिवाळी अधिवेशन लांबणीवर टाकल्यानं गेल्या काही दिवसांपासून जोरदार आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरु होतं.

गुजरात निवडणुकीच्या तोंडावर सरकारला काही नको असलेल्या विषयांची चर्चा टाळायचीय, त्यामुळेच संसदेच्या अधिवेशनाला वेठीस धरलं जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

अमित शहा यांचा पुत्र जय शाह यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, जीएसटीच्या अंमलबजावणीतले घोळ या विषयावरुन विरोधक हिवाळी अधिवेशनात गदारोळ करण्याची शक्यता होती. अधिवेशनातल्या विषयांची मीडियातही हेडलाईन होत असल्यानं सरकारला गुजरातच्या रणधुमाळीत हा धोका पत्करायचा नव्हता असा आरोप होतोय. अर्थात सरकारच्या वतीनं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी मात्र हे आरोप फेटाळलेत.

निवडणुकांच्या वेळापत्रकाचा अधिवेशनाच्या कामगिरीवर परिणाम होऊ नये म्हणूनच अधिवेशन नंतर घेतलं आहे. याआधी काँग्रेसनंही आपल्या कार्यकाळात अधिवेशनांच्या तारखांमध्ये राजकारण केलेलंच आहे, असं प्रत्युत्तर जेटलींनी दिलं होतं.

एरव्ही नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होऊन किमान चार आठवडे हिवाळी अधिवेशन चालतं. यंदा मात्र तब्बल महिनाभर हे अधिवेशन पुढे गेलंय. ख्रिसमसच्या सुट्टीदरम्यानच चालणारं हे अधिवेशन केवळ तीन आठवड्यांचं असणार आहे.