नवी दिल्ली : राज्यसभेत आज एक ऐतिहासिक घटना घडली आहे. तत्काळ तिहेरी तलाक विधेयक लोकसभेनंतर आता राज्यसभेतही मंजूर झालं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल. देशाला स्वातंत्र्य मिळून 72 वर्ष झाली आहेत, पण देशातल्या मुस्लीम महिला खऱ्या अर्थाने आज स्वतंत्र झाल्या.


व्हॉट्सअॅपवर, ई-मेलवर, मेसेजवर किंवा अगदी व्हीडिओ कॉलवरुन तात्काळ तिहेरी तलाक दिले जात होते. एका क्षणात मुस्लिम महिला रस्त्यावर येत होत्या. कुटुंबं उद्ध्वस्त व्हायची. पण या मनमानीला आज सरकारनं वेसण घातली आहे. तात्काळ तलाकविरोधातलं मुस्लीम महिला हक्क संरक्षण विधेयक आज राज्यसभेत मंजूर झालं.

तात्काळ तिहेरी तलाकविरोधातील विधेयकाच्या बाजूनं 99 मतं तर विरोधात 84 मतं पडली. हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याची काँग्रेसची मागणीही नामंजूर झाली.

तात्काळ तलाक देणाऱ्यांचू तुरुंगात रवानगी केली तर महिलेच्या कुटुंबाला पोटगी कोण देणार? तिच्या मुलांचं काय होणार? असे भावनिक प्रश्न निर्माण करुन काँग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादीनं कायद्याला विरोध केला. पण त्यालाही सरकारनं चोख उत्तर दिलं. लोकसभेत याआधीच विधेयक पारीत झालं आहे. आता राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर त्याचं कायद्यात रुपांतर होईल.

तात्काळ तिहेरी तलाक विधेयकाबाबतचे महत्त्वाच्या गोष्टी
1. तात्काळ तिहेरी तलाक देणाऱ्यांना पोलीस तातडीनं अटक करु शकतात, मात्र त्यासाठी स्वतः महिलेनं तक्रार करायला हवी
2. महिलेच्या रक्ताचे नातेवाईकही तक्रार दाखल करु शकतात, परंतु शेजारी -किंवा अनोळखी व्यक्तींना तक्रार करता येणार नाही
3. तोंडी, लेखी, व्हॉट्सअॅपवर तलाक देणाऱ्यांना तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते
4. पीडित महिलेची बाजू ऐकल्यानंतर आरोपीला तात्काळ जामीन दिला जाऊ शकतो
5. महिलेनं तयारी दर्शवली तर मॅजिस्ट्रेट समजुतीने प्रकरण सोडवण्याची मुभा देतील
6. पीडित महिला पोटगी मागू शकते
7. पोटगीजी रक्कम किती असावी हे न्यायाधीश ठरवतील
8. पीडितेची मुलं अज्ञान असतील तर त्यांची कस्टडी कोणाकडे असेल हे न्यायाधीश ठरवतील
9. तात्काळ तिहेरी तलाकला हद्दपार कऱणारा भारत हा जगातला एकविसावा देश आहे.
10. भारताआधी इजिप्त, सुदान, श्रीलंका, इराक, सायप्रस, जॉर्डन, अल्जेरिया, इराण, ब्रुनेई, मोरोक्को, कतार, संयुक्त अरब अमिरात, बांगलादेश इतकंच काय अगदी पाकिस्तानातही तिहेरी तलाकवर बंदी आहे.

इस्लाममध्ये लग्न म्हणजे कॉन्ट्रॅक्ट, त्याला सात जन्मांचा मुद्दा बनवू नका : असदुद्दीन ओवेसी | ABP Majha