मुंबई :  कावेरी नदीच्या पाण्यावरुन कर्नाटक आणि तामिळनाडूत प्रचंड धुसफूस सुरु आहे. बंगळुरुत 16 पोलीस स्टेशन परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, तर काल एकाच डेपोतील तब्बल 56 बस पेटवण्यात आल्या.


 

प्रशासनाने तणाव निवळण्यासाठी तब्बल 15 हजार पोलिसांना रस्त्यावर उतरवलं आहे.

 

पुढचे 10 दिवस दररोज तामिळनाडूला 12 हजार क्युसेक्स पाणी सोडा, असे आदेश काल सुप्रीम कोर्टानं कर्नाटकला दिले आहेत.



या आदेशविरोधात काल दिवसभर बंगळुरु, म्हैसूरसह इतर शहरांमध्ये तोडफोड आणि जाळपोळीचं सत्र पाहायला मिळालं. ज्यात तामिळनाडूच्या शेकडो वाहनांचं नुकसान झालं आहे. तामिळनाडूच्या अनेकांना बेदम मारहाण करण्यात आली.



दरम्यान बंगलोरमधली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल 15 हजार पोलिस तैनात करण्यात आलेत. तसंच नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये असं आवाहनही कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलंय.

 

जयललितांचं सिद्धरामय्यांना पत्र

कर्नाटकातील हिंसा आणि तामिळी नागरिकांवर होणारे हल्ले पाहता, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी सिद्धरामय्यांना पत्र लिहिलं आहे. तामिळी नागरिकांची आणि त्यांच्या संपत्तीच्या सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

 

केरळ-कर्नाटक वाहतूक रोखली

कर्नाटकातील परिस्थिती पाहता केरळ सरकारने बंगळुरूला जाणाऱ्या बस रोखल्या आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांशी बातचीत केली.

 

काय आहे कावेरीच्या पाण्याचा वाद?


*कावेरी नदीचा उगम कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यातील आहे. पुढे ही नदी वाहात तामिळनाडू, केरळ आणि पाँडिचेरीतून बंगालच्या उपसागराला मिळते

 

*1892 आणि 1924 मध्ये म्हैसूर आणि मद्रास प्रांतात झालेल्या पाणीवाटप करारावरुन वादाला तोंड

 

*1990 साली सुप्रीम कोर्टानं कावेरी ट्रिब्युनलकडे वाद सोपवला, 1991 ला तामिळनाडूला 205 टीएमसी पाणी तामिळनाडूला देण्यास सांगितलं.

 

*2007 मध्ये ट्रिब्युनलनं तामिळनाडूला 419 टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश दिला, वर्षात 10 वेळा हे पाणी सोडण्याची सूचना

 

*यंदा कमी पाऊस झाल्यानं कावेरी निम्मं रिकामं असल्याचं कारण देत कर्नाटकानं पाणी सोडण्यास विरोध केला

 

*तर 40 हजार हेक्टरवरचं सांबा पीक वाचवायचं असेल तर तामिळनाडूला पाणी सोडणं गरजेचं असल्याचा दावा जयललितांनी केला

 

*5 सप्टेंबर 2016 - सुप्रीम कोर्टानं 10 दिवस दररोज 15 हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचे आदेश दिले, त्यावरुन जाळपोळ, बंद, धरणं आंदोलनं सुरु झाली

 

*9 सप्टेंबर 2016 - कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींना पत्र लिहिलं, कावेरीचं पाणी तामिळनाडूला दिलं तर पिण्याचा पाण्याचा प्रश्नगं भीर होईल

 

*12 सप्टेबर 2016 - कर्नाटकच्या विरोधानंतर सुप्रीम कोर्टानं 10 दिवस 15 हजाराऐवजी 12 हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचे आदेश दिले

संबंधित बातम्या

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही कावेरीचा पाणी प्रश्न कायम