नाफेडने तूर खरेदी थांबवल्याने तूर उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. राज्यात जवळपास 316 तूर खरेदी केंद्र आहेत. सद्यस्थितीत प्रत्येक केंद्राबाहेर अंदाजे 20 हजार क्विंटल तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणलेली आहे. अजूनही तुरीची आवक सुरुच आहे. त्यामुळे लवकरात लवकर तूर खरेदी सुरु करावी, असे पत्र राज्यातील बाजार समित्यांनी सरकारला पाठवले आहेत.
दरम्यान उद्या (मंगळवार) होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत तूर खरेदीबाबत मोठा निर्णय होऊ शकतो. सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी याबाबत संकेत दिले आहेत.
कोणत्या बाजार समितीत किती तूर शिल्लक?
- अमरावती - अचलपूर बाजार समितीत 40 हजार क्विंटल खरेदी झाली आहे. तर 25 हजार क्विंटल तूर शिल्लक आहे.
- सोलापूर - माढा बाजार समितीत 19 हजार 700 क्विंटल तूर खरेदी झाली आहे. तर 5 हजार क्विंटल तूर शिल्लक आहे.
- लातूर - लातूर, चाकूर, जळकोट बाजार समित्यांमध्ये 75 हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. तर 20 हजार क्विंटल तूर शिल्लक आहे.
- उस्मानाबाद - बाजार समितीमध्ये 32 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर 1 लाख क्विंटल तूर शिल्लक.
- अहमदनगर - बाजार समितीमध्ये 2 लाख 7 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. 25 हजार क्विंटल तूर शिल्लक.
- नांदेड - बाजार समितीमध्ये 1 लाख 12 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर 20 हजार क्विंटल तूर शिल्लक.
- जालना - बाजार समितीमध्ये 1 लाख 42 हजार 665 क्विंटल तूर खरेदी झाली. तर 29 हजार क्विंटल तूर शिल्लक.
- धुळे - बाजार समितीमध्ये 29 हजार 794 क्विंटल तूर खरेदी झाली. तर 400 क्विंटल तूर शिल्लक.
- नंदुरबार - बाजार समितीमध्ये 28 हजार 405 क्विंटल तूर खरेदी झाली. तर 4 हजार क्विंटल तूर शिल्लक.
- बीड - बाजार समितीमध्ये 2 लाख 80 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर 1 लाख क्विंटल तूर शिल्लक.
- अकोला - सर्व बाजार समित्यांमध्ये मिळून आतापर्यंत 2 लाख 58 हजार 388 क्विंटल तूर खरेदी झाली. तर 1 लाख क्विंटलपेक्षा जास्त तूर शिल्लक.
- वर्धा - जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये मिळून 1 लाख 14 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर 1 लाख क्विंटलपेक्षा जास्त तूर शिल्लक.
- यवतमाळ - जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये मिळून 1 लाख 32 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर 3 लाख 75 हजारांपेक्षा जास्त तूर शिल्लक.
तूर विक्रीसाठी सरकारकडून धान्य तारण योजनेचा पर्याय
शेतकऱ्याला आर्थिक गरजेपोटी स्थानिक पातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे शेतमालाच्या काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी येतो.
शेतमालाचे बाजारभाव खाली येतात. शेतमाल साठवणूक करुन काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालाला जादा बाजारभाव मिळू शकतो. म्हणून शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा यासाठी 1990-19 सालापासून शेतमाल तारण कर्ज योजना सुरु करण्यात आली.
या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, काजू बी, बेदाणा आणि हळद या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किंमतीच्या 75 टक्क्यांपर्यंत रक्कम 6 महिने कालावधीसाठी 6 टक्के व्याजदराने तारण कर्ज देण्यात येतं.
कृषी तारण योजना बाजार समित्यांमार्फत राबवली जाते. सहा महिन्यांच्या आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना 3 टक्के व्याज सवलत देण्यात येते.
संबंधित बातम्या :