नवी दिल्ली : काश्मीरमध्ये दंगली भडकवण्यासाठी तब्बल 300 व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आल्याची माहिती काश्मीरमधल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या पैकी 90 टक्के ग्रुपवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.


गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमधल्या अनेक शहरांमध्ये सैन्यावर दगडफेकीच्या घटना सुरु आहेत. भारतीय लष्करावरचा असंतोष तीव्र करण्यासाठी कट्टरवाद्यांनी 300 व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करुन, त्याद्वारे द्वेष पसरवण्याचं काम सुरु असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला दिली.

या ग्रुपमध्ये काश्मीरमधल्या महाविद्यालयीन तरुणांना सहभागी करुन, त्यांच्या मनात लष्कराविरुद्धच्या भावना भडकवल्या जात आहे. तूर्तास अशा 90 ट्क्के ग्रुपवर सुरक्षा यंत्रणांनी नियंत्रण मिळवलेलं आहे.

ग्रुपमध्ये सामील असणाऱ्या आणि तो ग्रुप तयार करणाऱ्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं असून, शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पण कारवाईआधी समुपदेशन करुन, त्यांची समजुतही काढली जाणार आहे.

दरम्यान, काश्मीर खोऱ्यातील इंटरनेट सेवा बंद केल्याने दगडफेकीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं आहे.

तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा रक्षकांवर दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गृह मंत्रालयानं प्लॅन बी तयार केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशांतता पसरवणाऱ्यांचा सामना करण्यासाठी सुरक्षा रक्षकांना प्लास्टिकच्या बुलेट पुरवण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या

दगडफेकीनंतर काश्मीरमध्ये शाळा-महाविद्यालये बंद

काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांवरील दगडफेकीला उत्तर देण्यासाठी 'प्लॅन बी' तयार

काश्मीर हिंसाचार : पेलेट गनमुळे आंदोलकांच्या डोळ्याला गंभीर इजा

श्रीनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण, पोलिसांवर दगडफेक