हिंगोली : हिंगोली येथील आपल्या निर्धार सभेतून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 'शासन आपल्या दारी, थापा मारतो लय भारी' अशा खोचक शब्दात उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे हिंगोली येथील सभेत बोलत असून, आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सत्तधारी पक्षावर निशाणा साधला. सरकार आपल्या दारी म्हणत असून, योजना फक्त कागदावरी असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 


काही जणांना अपेक्षा असेल मी गद्दरांवर बोलेन, पण मी गद्दरांवर वेळ घालवणार नाही. मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो असून, त्यावरच बोलणार आहे. मागे नागपंचमी झाली. आपण या गद्दाराला दूध पाजले पण त्याने पलटून चावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा सापांना पायखाली ठेचलं पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला. 


'हे कसले हिंदू, याला नामर्द म्हणतात'


सरकारवर आणि भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "डबल इंजिन सरकार आणि आता त्यात अजितदादांचा एक डबा लागला आहे. अजून किती डबे लागणार आहेत? मालगाडी होतेय यांची. तुमच्या पक्षात कर्तृत्व नाही? तुम्हाला नेते माझे लागतात, वडील माझे लागतात, पक्ष फोडला, पक्ष सोडला वडील माझे वापरायचे. का तुमच्या दिल्लीतील वडिलांकडे मते मागायची हिंमत राहिली नाही? चोरणार माझे वडील, इतर पक्षातील नेते चोरणार आणि म्हणणार आम्ही हिंदू आहोत. अरे कसले हिंदू, याला नामर्द म्हणतात. ही नामर्दांगी आहे."


फडणवीस यांचं नाव न घेता टरबूज असा उल्लेख


हिंगोलीतील निर्धार सभेत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जोरदार टीका केला. "फडणवीस यांना मी बोलणं सोडलं मागे मी त्यांना कलंक बोललो, त्यांना फडतूस बोललो तर बोभाटा झाला. आता मी त्यांना थापाड्या म्हणणार होतो पण त्यांना आता थापाड्या म्हणत नाही," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. शिवाय "राज्यात दुष्काळ हे आणि देवेंद्र फडणवीस जपानमध्ये आहेत. टरबूजालाही पाणी लागतं," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचं नाव न घेता टरबूज असा उल्लेख केला. 


भारत-पाकिस्तान सामन्यावरुन पंतप्रधानांना सवाल


दरम्यान आगामी आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकमध्ये 14 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघात हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे. या महामुकाबल्याचं आयोजन हे अहमदाबादमधीन नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. तुमच्या स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना चालतो, हे कुठलं देशप्रेम आहे, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला.


हेही वाचा