हिंगोली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (27 ऑगस्ट) रोजी हिंगोली येथील रामलीला मैदानावर सभा होणार आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या महत्वाच्या नेत्यांच्या जिल्ह्यात सभा घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यानच्या काळात झालेल्या राजकीय उलथापालथ पाहता या सभांना ब्रेक लागल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता पुन्हा उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून, आज ते हिंगोलीत जाहीर सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांच्या जिल्ह्यात ही सभा होत असल्याने उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तर, निकराने लढू, गड उभारु पुन्हा, असा सभेपूर्वीच त्यांचा टीझर जाहीर झाला आहे. त्यामुळे त्यांच्या या सभेची जोरदार चर्चा आहे.


आगामी निवडणुका लक्षात घेता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून, सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. दरम्यान, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाड्यातील पहिली सभा उद्धव ठाकते हिंगोली जिल्ह्यात घेत आहे. आदित्य ठाकरेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ते कुणाचा समाचार घेतील? याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे संतोष बांगर यांनी अनेकदा उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केली आहे. त्यामुळे आजच्या सभेतून उद्धव ठाकरे बांगर यांचा देखील समाचार घेण्याची शक्यता आहे. सोबतच शिंदे गटासह भाजप देखील उद्धव ठाकरे टीका करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांची सभा हिंगोली जिल्ह्यात असताना शेजारच्या परभणी जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे शासन आपल्या दारी उपक्रमात सभा घेत आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या या सभेला आणखीच महत्त्व आले आहे. टीझरमध्ये तर गर्दीकडे बोट दाखवत ठाकरे यांनी 'हीच शिवसेना आहे. ज्याला संपवायची आहे, त्याने ती संपवून दाखवावे,' असे आव्हान दिले आहे. त्यामुळे या सभेतून उद्धव ठाकरे कोणावर आणि काय टीका करणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


ठाकरे गटाकडून जोरदार तयारी... 


उद्धव ठाकरे यांच्या हिंगोलीत होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मागील आठवड्याभरापासून तयारी करण्यात येत आहे. तर ठाकरे गटाचे अनेक महत्वाच्या नेत्यांनी एक दिवस आधीच हिंगोली गाठत सभेच्या ठिकाणाचा आढावा घेतला. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी आढावा घेतला. तसेच अनेक ठिकाणी बैठका घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे कोणावर काय बोलणार याकडे ठाकरे गटाचे लक्ष लागले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Marathwada Political Sunday : मराठवाड्यात आज 'सभांची जत्रा', सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून झाडल्या जाणार आरोपांच्या फैऱ्या