हिंगोली : पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये (Mahayuti) रस्सीखेच पाहायला मिळत असताना हिंगोलीचे पालकमंत्री सुद्धा यात मागे नाहीत. वसमतमध्ये आमदार राजू नवघरे (Raju Navghare) यांच्या वतीने हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आलं होतं. यात नरहरी झिरवाळ यांनी माझ्यासारख्या गरिबाला हिंगोलीसारख्या (Hingoli News) गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री केले, याचा वरिष्ठांना जाब विचारणार, अशी मनातील खदखद व्यक्त त्यांनी व्यक्त केली. नरहरी झिरवाळ यांच्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. 


राज्य सरकारकडून मागील आठवड्यात रविवारी (दि. 18) सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. कारण नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि रायगडमध्ये अदिती तटकरे यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे नाशिकमध्ये दादा भुसे आणि रायगडमध्ये भरत गोगावले यांच्या समर्थकांनी कमालीची नाराजी व्यक्त केली होती. यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. तसेच पालकमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे हे नाराज होऊन साताऱ्यातील दरे गावात निघून गेल्याची चर्चा रंगली होती. तर दुसरीकडे दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ यांना हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे.  


नरहरी झिरवाळांची मनातील खदखद समोर


यामुळे वसमतमध्ये आमदार राजू नवघरे यांच्या वतीने हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आलं होतं. या सत्कारात बोलताना नरहरी झिरवाळ यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलंय की, मी पहिल्यांदा मंत्री झालो, पहिल्यांदा पालकमंत्री झालो. मला इथे आल्यावर समजलं की, माझ्यासारख्या गरिबाला हिंगोली सारख्या गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री केले आहे.  आता मुंबईला गेल्यानंतर वरिष्ठांना विचारणार आहे की तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला? असे त्यांनी म्हटले. नरहरी झिरवाळ यांच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.


कोण आहेत नरहरी झिरवाळ? 


2004 सालच्या विधानसभा निवडणुकीत नरहरी झिरवाळ हे दिंडोरी मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली. मात्र, लोकसभा निवडणुकीत देखील त्यांचा पराभव झाला. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून 2004, 2014 व 2019, 2024 या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये झिरवाळ चार वेळा आमदार झाले आहेत. विधानसभा उपाध्यक्ष या नात्यानं राज्यातील सत्ता संघर्षाच्या काळात नरहरी झिरवाळ राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले होते. शरद पवार यांच्या आशीर्वादाने दिंडोरीचे आमदार झालेले नरहरी झिरवाळ अजित पवारांशी एकनिष्ठ आहेत. 


आणखी वाचा 


Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..