Hingoli: राज्यात वाढत्या थंडीचा परिणाम आता ग्रामीण भागात दिसून येत असून गेल्या आठवड्यापासून राज्यात हाडं गोठवणारी थंडी अनुभवायला मिळतेय.या थंडीमुळं नागरिकांसह दुभती जनावरंही गारठली आहेत.परिणामी जनावरांच्या दुधाच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. दुधाच्या उत्पादनात मागील काही दिवसांपासून प्रचंड घट होत असून 20-25 टक्क्यांपर्यंत उत्पादन घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. (Milk Production)


हिंगोलीच्या ब्रम्हपुरी येथील शेतकरी त्यांच्याकडे8 दूध देणारी जनावरे आहेत. मागील 8 दिवसापासून वाढलेल्या थंडीचा परिणाम त्यांच्या दुधाच्या उत्पादनावर पाहायला मिळतोय. नेहमी त्यांना 60 लिटर इतकं दूध उत्पादन होतं. परंतु, मागील 8 दिवसापासून वाढलेल्या थंडीमुळे या उत्पादनात घट झाली आहे.आता दररोज 43 लिटर इतकं दूध निघत आहे, त्यामुळे याचा जर बाजारभावानुसार आर्थिक गणित लावलं तर दररोज 1 हजार रुपये  एवढा आर्थिक फटका या शेतकऱ्याला बसतोय . (Temperature Effect)


शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं


पुसेगाव येथील दुसरे शेतकरी सौरभ जवळे यांच्याकडेही 11 म्हशी आहेत. एरवी 60 ते 65 लिटर दूध निघायचं, आता थंडी वाढल्यामुळे  त्यांचं दूध 45 लिटरवर येऊन ठेपलं असल्याचं सौरभ जवळे सांगतात. त्यामुळे आर्थिक फटका थेट शेतकऱ्याला सहन करावा लागतो.दरम्यान या दुग्धजन्य जनावरांना थंडीचा जास्त फटका बसू नये आणि याचा परिणाम दुधाच्या उत्पादनावर होऊ नये यासाठी शेतकऱ्याकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. या जनावरांना शेकोटीची उब देणे जनावरांच्या अंगावर बारदाण्याची झुल पांगरणे, यासह त्यांच्या आहारातही मोठा बदल करत दूध उत्पादन घटू नये यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत .दुधाच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. थंड हवामानाचा दुधाळ जनावरांच्या आरोग्यावर होणारा परिणाम पाहता, या परिस्थितीत सरकारकडून मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.थंडीचा हा फटका केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. दूध उत्पादनात घट झाल्याने बाजारात पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. 


राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज


राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार होत असून पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. उत्तर कोकणासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय. किमान तापमान येत्या दोन दिवसात हळूहळू वाढणार असून दोन ते तीन अंशांनी त्यात वाढ होणार आहे.


हेही वाचा:


राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, गारठा प्रचंड वाढला, IMDने तापमानाबाबत काय दिलाय इशारा?