मुंबई : ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या निवासस्थानी भेट झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर आता शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही भेटलो ते खरं आहे, पण गुप्त भेट नव्हती, तो फक्त योगायोग होता असं संतोष बांगर म्हणाले. तर जिल्ह्यातील प्रश्न घेऊन आपण अब्दुल सत्तारांना भेटल्याचं आष्टीकरांनी स्पष्ट केलं. 


आमदार संतोष बांगर म्हणाले की, खासदार नागेश आष्टीकरांना भेटलो हे खरं आहे, पण ती भेट केवळ योगायोग होती. पालकमंत्र्यांच्या चेंबरमध्ये आपण बसलो असता त्या ठिकाणी नागेश आष्टीकर आले. आम्ही चहा घेतला आणि ते त्यांचं काम झाल्यानंतर निघून गेले. त्या ठिकाणी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. 


राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आणि मित्रत्व हे वेगळं असल्याचं संतोष बांगर यांनी सांगितलं. 


राजकीय अर्थ काढू नये, आष्टीकरांची प्रतिक्रिया


याच भेटीवर ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर म्हणाले की, अब्दुल सत्तार आमचे पालकमंत्री आहेत. त्यांची भेट मी कामानिमित्त घेतली. हिंगोली जिल्ह्यात चाळीस गावांमध्ये विजेचा प्रश्न आहे, त्यासाठी मी त्यांची भेट घेतली. त्या ठिकाणी संतोष बांगर सुद्धा आले होते. आता शासकीय ते निवासस्थान आहे, त्यामुळे मी त्यांना काही बोलू शकत नाही. शिंदेंच्या मंत्र्यांसोबत आणि आमदारांची जर मी कामानिमित्त भेट घेतली असेल तर त्याचा कुठलाही राजकीय अर्थ काढू नये. 


नेमकं काय घडलं? 


ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची बुधवारी राज्याचे मंत्री अब्दुर सत्तार यांच्या घरी भेट झाली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंगोलीसह मराठवाड्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. 


लोकसभा निकालाच्या दुसऱ्याच दिवशी ठाकरे गटाचे काही खासदार हे आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाने केला होता. तर शिंदे गटाचे काही आमदार हे आपल्या संपर्कात असून येत्या विधानसभेला ते पुन्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली एकत्रित येतील असा दावा ठाकरे गटाने केला होता. त्याची सुरूवात आता हिंगोलीतून झाली आहे का अशी चर्चा या भेटीच्या निमित्ताने सुरू आहे. 


ही बातमी वाचा: