Lumpy Skin Disease: राजस्थानसह देशभरात थैमान घालणारा जनावरांमधील लम्पी (Lumpy) आजाराचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र असे असलं तरीही काही जिल्ह्यात अजूनही बाधित जनावरे आढळून येत असून, त्यांची संख्या देखील वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर लम्पीचं संकट उभं राहिलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli District) पूर्णा तालुक्यातील ताडकळसमध्ये पुन्हा लम्पी आजाराने डोकेवर काढले असून, बाधित जनावरांची संख्या आता 20 वर पोहचली असल्याची स्थिती आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. 


लम्पी त्वचा रोग आजार नियंत्रणासाठी ताडकळस परिसरातील 18 गावांमध्ये जनावरांचे लसीकरण करण्यात आले होते. मात्र असे असताना पुन्हा एकदा लम्पी आजाराने डोकेवर काढले असून, ताडकळस परिसरातील बाधित जनावरांची संख्या आता 20 वर पोहचली असल्याची स्थिती आहे. यात वासरांनाही लागण होत असल्याने पशुपालकांमधून चिंता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ताडकळस आणि परिसरातील 18 गावांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बिराजदार यांच्या पथकाने लसीकरण केले होते. मात्र, काही दिवसांपासून या परिसरात लम्पी आजाराने परत शिरकाव केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


परिसरात आतापर्यंत 20 जनावरांना लागण 


ताडकळस परिसरात पुन्हा एकदा जनावरांमध्ये लम्पी आजाराची लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, फुलकळस येथील शेतकरी रंगनाथ सूर्यवंशी यांच्या गुरांचा लम्पी आजाराने मृत्यू झाला आहे. तर ताडकळस येथील अलोक महाजन यांच्या अवघ्या 20 दिवसाच्या वासरास या आजाराची लागण झाली. त्यामुळे आता इतर शेतकरी देखील आपल्या जनावरांची काळजी घेत आहे. मात्र परिसरात आतापर्यंत 20 जनावरांना लागण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पशुपालकांनी घाबरून न जाता जनावरांमध्ये लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


काय काळजी घ्याल? 


बाधित आढळून आलेल्या जनावरांचं विलगीकरण केलं पाहिजे, जेणेकरून ते इतर जनावरांच्या संपर्कात येणार नाहीत. या जनावरांना चारा आणि पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजे. लम्पीची जनावरांना लागण झाल्यावर तत्काळ परिसरातील पशुसंवर्धन विभागाला याबाबत माहिती दिली पाहिजे. सोबतच बाधित जनावरांवर पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन उपचार केले पाहिजे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Agriculture News : अवकाळी पावसानं केळीच्या बागा जमिनदोस्त, रब्बी पिकंही मातीमोल; हिंगोलीसह यवतमाळ जिल्ह्याला मोठा फटका