हिंगोली : राज्यभरात मोठ्या उत्साहात आज गणरायाला निरोप दिला जात असून, ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुका निघाल्या आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी देखील हिंगोली (Hingoli) येथील विघ्नहर्ता गणपती मंदिराचे दर्शन घेतले. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची सर्वदूर ख्याती आहे. त्यामुळे, “2024 ला एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी विघ्नहर्ता गणपतीकडे नवस केला असून, यासाठी मोदक घेतला असल्याचं आमदार बांगर म्हणाले आहेत. 


हिंगोली येथील विघ्नहर्ता गणपती मंदिराचे दर्शन घेतल्यावर माध्यमांशी बोलताना, आमदार संतोष बांगर म्हणाले की, “2019 ला मी मोदक घेतला होता आणि एका वर्षात मी आमदार झालो. त्यामुळे माझा नवस पूर्ण झाला होता. तर, देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पुन्हा यावे यासाठी आज प्रार्थना केली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी 2024 ला पुन्हा मुख्यमंत्री राहावेत यासाठी नवसाचा मोदक घेतला असल्याचे आमदार बांगर म्हणाले आहेत. तसेच, अपात्रेच्या सुनावणीबाबत आमचे सर्व आमदार पात्र ठरतील असा मला विश्वास असल्याचं देखील बांगर म्हणाले आहेत. 


नवसाच्या मोदकसाठी भाविकांची गर्दी...


राज्यभरात आज आनंद चतुर्दशीनिमित्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी नागरिक सज्ज आहेत. हाच उत्साह हिंगीलो जिल्ह्यात देखील पाहायला मिळत असून, हिंगोलीत विघ्नहर्ता चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रासह परराज्यातून सुद्धा अनेक भक्तमंडळी आपल्या नवसाचा मोदक नेण्यासाठी गर्दी करत असतात. विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीकडे भक्त नवस मागतात आणि त्या माध्यमातून एक मोदक आपल्या घरी घेऊन जातात. हा नवस पूर्ण झाल्यानंतर पुढच्या वर्षी त्या नवसाची परतफेड करण्यासाठी 1001 मोदकाची वाटप करतात. हाच मोदक घेण्यासाठी हजारो भक्तांची गर्दी आता चिंतामणी गणपती मंदिर परिसरामध्ये दिसून येत आहे.


हिंगोली जिल्ह्यात देखील आज बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. यंदा 1 हजार 422 गणेश मंडळांनी गणेशमूर्तीची स्थापना केली. दहा दिवस विविध उपक्रम राबविल्यानंतर आज 1 हजार 359 सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे. भक्तांना गणेशमूर्ती विसर्जन करणे सोयीचे व्हावे यासाठी हिंगोली शहरात जलेश्वर तलाव, सिरेहकशाह बाबा तलाव व कयाधू नदी या तीन विसर्जन घाटांसह लहान मूर्ती विसर्जनासाठी आदर्श महाविद्यालय, तिरुपतीनगर कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, शिवाजीनगरातील दत्तमंदिर, जुने पालिका कार्यालय, नवीन पालिका कार्यालय, एनटीसी भागातील महेश उद्यान या सात ठिकाणी कृत्रिम कुंड ठेवण्यात येणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Hingoli Ganpati : हिंगोलीत नवसाचा मोदक घेण्यासाठी भक्तांची गर्दी, चिंतामणीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा