हिंगोली : नाशिक, बीड, परभणीनंतर हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी बोगस पीकविमा (Bogus Crop Insurance) काढल्याचं कृषी विभागाच्या प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.  कृषी विभागाच्या (Agriculture Department) वतीने केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये 1800 शेतकऱ्यांनी (Farmers) 4500 हेक्टरवर बोगस पिक विमा भरल्याची माहिती समोर येत आहे. 


बळीराजाला अनेक नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतो. नैसर्गिक संकटामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. बळीराजाला पिकांच्या नुकसानीचा मोबदला मिळावा, आर्थिक मदत व्हावी, या हेतुने शासनाने पीक विमा योजना (Crop Insurance Scheme) राबविण्याचा निर्णय घेतला. यानुसार केवळ एक रुपया भरून पीक विमा काढता येत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला तरी बोगस पीकविमा काढला जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. 


शासकीय जमिनीवरच पीक विमा 


राज्यभरामध्ये बोगस पीक विम्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात देखील कृषी विभागाच्या वतीने केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये 1800 शेतकऱ्यांनी 4500 हेक्टरवर बोगस पिक विमा भरल्याचे उघड झाले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी हे बाहेरील जिल्ह्यातील आहेत. तर काही शेतकऱ्यांनी शासकीय जमिनीवरच पीक विमा भरल्याचे उघड  झाले आहे. 


ग्राहक सेवा केंद्रावर काय कारवाई होणार? 


काही शेतकऱ्यांच्या जमिनीची अभिलेखात नोंदच नाही, अशा जमिनीवर देखील पिक विमा भरण्यात आला आहे.कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा पिक विमा कोणत्या ग्राहक सेवा केंद्रावरून भरला आहे? याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. त्यानंतर त्या ग्राहक सेवा केंद्रावर काय कारवाई केली जाते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी काढलाय पीक विमा


हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामात 4 लाख 72 हजार 15 शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला आहे. यात हिंगोली 87 हजार 594, सेनगाव तालुक्यात 1 लाख 10 हजार 768, वसमत 1 लाख 2 हजार 906, औंढा ना. 88 हजार 795, कळमनुरी 82 हजार 152 शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत बोगस 1800 अर्ज भरल्याचे समोर आले आहे. बोगस पीक विम्याचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या 


सोयाबीन खरेदीची मुदत संपली, राहिलेल्या सोयाबीनचं करायचं काय? शेतकरी चिंतेत, राज्य सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव 


PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम