जालना : शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील एक रुपयात संपूर्ण आरोग्य चाचणी या योजनेला लवकरच मूर्त स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती, राज्याचे नवीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालन्यात एबीपी माझाशी बोलत होते. नुकताच खातेवाटप जाहीर झाल्यानंतर राजेश टोपे यांच्या वाट्याला सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे खाते आले असून आपण समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान या खात्याची व्याप्ती आणि जनतेच्या मूलभूत सुविधेपैकी एक असलेल्या या आरोग्य खात्याला आपण न्याय देणार असल्याचा संकल्प देखील त्यांनी बोलून दाखवला.

शिवसेनेच्या जाहीरनाम्यात 10 रुपयात थाळी आणि 1 रुपयात आरोग्य चाचणी हे दोन कार्यक्रम जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एक रूपयात आरोग्य चाचणीची संकल्पना देखील लवकरच अंमलात येऊ शकते, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका घोषणेची अंमलबजावणी प्रायोगिक तत्वावर 10 रुपयात जेवणाची थाळी देऊन करण्यात आली आहे. तर दुसरी घोषणा म्हणजेच 1 रुपयात आरोग्य चाचणी ही योजनेची देखील अंमलबजावणी दृष्टिक्षेपात असल्याचे टोपे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा- महाराष्ट्राच्या विकासासाठी खुप काम करु, खातेवाटपानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

राज्यात आरोग्य विभागाला नवी दिशा देण्याचं काम आम्ही करु, असेही ते म्हणाले. सामान्य माणसाला हे सरकार आपलं वाटलं पाहिजे. प्रशासनिक पातळीवर देखील लक्ष दिले जाईल. डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, ती संख्या भरुन काढून चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, असेही टोपे यांनी सांगितलं. आपल्याला राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी करावी लागणार आहे. राज्याच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये आवश्यक त्या सुधारणा देखील केल्या जातील, असेही टोपे यावेळी म्हणाले. ज्या कल्पना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मांडल्या आहेत, त्या देखील पूर्ण करु, असेही टोपे यांनी सांगितलं.

हे पाहा - Cabinet Expansion | मी शपथ घेतो की... | राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ 

राजेश टोपे हे राष्ट्रवादीचे मराठवाड्यातील महत्वाचे नेते आहेत. टोपे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. जालना जिल्ह्यातील घनसावंगी हा राजेश टोपे यांचा मतदारसंघ आहे. टोपे हे याआधीच्या आघाडी सरकारच्या काळात शिक्षणमंत्री देखील होते.


संबंधित बातम्या

 मंत्रिमंडळ खातेवाटपाला राज्यपालांची मंजुरी, अधिकृत खातेवाटप जाहीर 
Varsha Gaikwad | चांगलं शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहणार : वर्षा गायकवाड | ABP Majha 

'स्मशानात राहून जनतेची कामे करु', स्मशानाजवळील बंगला मिळाल्याने बच्चू कडू नाराज