मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या खातेवाटपावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खातेवाटपानंतर अनेकजण नाराज असल्याचं समोर आलं आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, आघाडीचं सरकार चालवताना तडजोड, देवाणघेवाण करावी लागते. ती सगळ्या पक्षांनी करायची असते. खातेवाटपावरून काँग्रेस पक्ष नाराज नाही, असंही राऊतांनी सांगितलं. तसेच भाजप पराभवातून अजून सावरलाच नाही. त्यांना अजूनही सत्तेची स्वप्न पडत असल्याचा टोला, संजय राऊतांनी लगावला आहे.


तीन पक्षाचे तीन नेते आहेत. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीत असल्याने राज्यातील नेत्यांना तेथे जावं लागतं. काही अपक्ष देखील महाविकास आघाडीसोबत आहेत. प्रत्येकाचे हट्ट, आवडी-निवडी, छंद पुरवावे लागतात. त्यामुळे मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर होण्यास उशीर झाला. सर्व खाती राज्याच्या आणि लोकांच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. जागांच्या तुलनेत काँग्रेसला महत्वाचा वाटा मिळाला आहे. कुणावरही अन्याय झालेला नाही. महाआघाडी स्थापन करण्यात शरद पवारांचं योगदान मोठं आहे. त्यामुळे त्यांनी महत्त्वाची खाती घेतली असतील तर त्यात काही गैर नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं. खातेवाटपानंतर आता महाराष्ट्राला शांत झोप लागेल. ज्यांना मंत्री व्हायचं होतं, त्यांना शांत झोप लागेल. मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालं, त्यामुळे सर्व मंत्र्यांनी आता कामाला लागलं पाहिजे, असंही राऊतांनी म्हटलं.



भाजपच्या ऑपरेशन लोटसची चिरफाड


शिवसेनेसमोर नाराजाचं आव्हान नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा हे प्रत्येक शिवसैनिकाचं स्वप्न होतं. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाने पक्षाच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. विरोधी पक्षापेक्षा सत्ताधारी पक्षात आहोत, याचा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे, असं संजय राऊतांनी नाराजांना उद्देशून म्हटलं. भाजपने ऑपरेशन लोटस सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र ऑपरेशन लोटस वैगेरे असं काही नसतं. सर्वात जास्त चिरफाड आम्ही करु शकतो आणि अनेक ऑपरेशन करु शकतो. विरोधी पक्षातील लोक असे हातखंडे वापरत असतात. याबाबत विरोधी पक्षाकडे आम्ही मनोरंजन म्हणून पाहतो. त्यामुळे सरकारची आणि लोकांनी प्रकृती चांगली राहते. असे मनोरंजनाचे कार्यक्रम झाले पाहिजेत. विरोधी पक्ष मनोरंजनाचं काम करत असेल तर त्यांनी ते करत राहावं. सांस्कृतिक मंत्रालयाने अशा कार्यक्रमांना रॉयल्टी देण्याची तरतूद करावी, असा चिमटा राऊतंनी विरोधकांना घेतला.


विरोधकांच्या डोक्यातून अजूनही सत्ता गेलेली नाही


आमचे मासे त्यांच्या जाणार नाहीत. आमचे लोक फार पोहोचलेले आहेत. त्यांनी खेळ करत राहावेत. कितीही ऑपरेशन केले तरी एकही यशस्वी होणार नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टिकेल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. रात्री डोळे मिटले की विरोधकांच्या स्वप्नात सत्ता येते. विरोधकांच्या डोक्यातून अजूनही सत्ता गेलेली नसून ते अजूनही धक्क्यातून सावरले नाहीत. या धक्क्यातून सावरायला त्यांना वेळ लागेल. विरोधकांना समुपदेशनाची (काऊन्सलिंग) गरज आहे. काऊसलिंग देण्यासाठी वैद्यकीय मंत्र्यांनी मदत केली पाहिजे. मी देखील विरोधकांचा उत्तम काऊन्सलिंग करु शकतो, अशी टीक संजय राऊतांनी केली. विरोधी पक्षाने सकारात्मक विचार करावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काम करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. सरकारकडून चुका झाल्या तर आम्हीही विरोध करु. मात्र विरोधकांनी उगाच विरोध म्हणून विरोध करु नये असं आवाहनही राऊतांनी केलं.


चंद्रकांत खैरे यांच्याही भावना समजून घ्यायला हव्यात

अब्दुल सत्तार यांच्या राजीनामा नाट्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, माझी कुणाशीही चर्चा झाली नाही. काँग्रेसमध्ये असलेले अब्दुल सत्तार निवडणुकीआधी अचानक शिवसेनेत आले. त्यांनी शिवबंधन बांधलं त्यावेळी मी शिवसेना सोडणार नाही. मरेपर्यंत शिवसेनेत राहीन, असा शब्द त्यांनी दिला आहे. माझा त्यांच्यावर विश्वास आहे. चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत बोलाताना राऊत म्हणाले की, सत्तार आणि खैरे यांच्यातील भांडण जुनं आहे. स्थानिक पातळीवर काम करताना त्यांच्यात अनेकदा संघर्ष झाला आहे. पक्षाने चंद्रकांत खैरे यांच्याही भावना समजून घ्यायला हव्यात, असं संजय राऊत यांनी सूचवलं.