मुंबई : बलात्काराच्या प्रकरणात बलात्कार करणाऱ्या आरोपीला साथ देणारा सहआरोपीही मूळ आरोपी इतकाच दोषी असतो, त्यामुळे त्यालाही तिच शिक्षा होऊ शकते, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पोक्सो आणि बलात्काराच्या एका खटल्यात बलात्कारी आरोपीला मदत करणाऱ्या सहआरोपीला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा हायकोर्टानं नुकतीच कायम ठेवली आहे.


नागपूर सत्र न्यायालयाने मागील वर्षी मार्चमध्ये आरोपी सुनिल रामटेकेला दोषी ठरवून 10  वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेविरोधात सुनिलनं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नामंजूर केली आहे. आरोपीने जरी प्रत्यक्षात बलात्कार केला नसला तरी बलात्कार करण्यासाठी मुख्य आरोपीला मदत मात्र केली आहे. त्याचबरोबर बलात्काराला प्रतिबंध करणाऱ्या पीडितेच्या बहिणीलाही आरोपीने दमदाटी करत विरोध केला होता. त्यामुळे या खटल्यात तो देखील मुख्य आरोपी इतकाच दोषी आहे आणि त्यालादेखील तिच शिक्षा लागू होते, असं महत्त्वपूूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

हेही वाचा - माझा विशेष | मुलाला मुलगी भेटते...तुम्हाला का खुपते?
तेरा वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीवर ऑगस्ट 2007 मध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली होती. संबंधित मुलीला एका खोलीत बंद करुन दाराची कडी बाहेरून या सहआरोपीने लावली होती, तसेच "विरोध करु नकोस, मी तुला पैसे देईन" असंही त्यानं पीडितेला सांगितले होते, तेसच त्याने पीडितेच्या बहिणीलाही दमदाटी केली होती, असेही सरकारी वकिलांनी युक्तिावादामध्ये मांडले आहे. मात्र सहआरोपीला सुनिलनं यात आपली काहीही चूक नसताना यामध्ये अडकविले आहे, असा दावा केला होता. भादंवि 109 मध्ये अशाप्रकारच्या गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतुद स्पष्ट केलेली नाही. मात्र अशी कृत्ये बलात्काराच्या गुन्हात तेवढीच जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांना शिक्षाही तेवढीच होऊ शकते, असं निरीक्षण नोंदवत हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली.