मुंबई : कुर्ल्याच्या ठक्कर बाप्पा विभागातून बेपत्ता झालेल्या आरती रिठाडीया मुलीचा पोलीस योग्य पद्धतीने शोध घेत नाही या निराशेतून पांचाराम रिठाडिया या तिच्या वडिलांनी आत्महत्या केल्याने ऑक्टोबर महिन्यात मोठी खळबळ उडाली होती. पांचाराम यांच्या अंत्ययात्रेत सहभागी जमावाने पोलिसांना मारहाण करीत पोलिसांची वाहने देखील फोडली होती. यामध्ये आठ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. मात्र या प्रकरणातील त्या मुलीचा देखील मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

टिळक नगर ते चेंबूर दरम्यान या मुलीचा मृतदेह लोहमार्ग पोलिसांना सापडला होता. 30 मार्च 2019 रोजीच वडाळा लोहमार्ग पोलिसांना तिचा मृतदेह टिळक नगर आणि चेंबूर स्थानकाच्या मध्ये आढळला होता. परंतु तिचे कोणीच वारस मिळत नसल्याने तीन महिन्यानंतर कायद्याने लोहमार्ग पोलिसांनी बेवारस म्हणून तिचे अंतिम संस्कार देखील केले होते. मात्र याची नोंद डीएनए सँपल आणि कपडे इत्यादी सायन येथील टिळक रुग्णालयात होते.

पांचाराम रिठाडिया यांच्या अंतिम यात्रेसाठी झालेली गर्दी

आपल्या मुलीचे त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने अपहरण केले असल्याचा आरोप रिठाडिया कुटुंबाने केला होता. बेपत्ता मुलीचा शोध लागत नसल्याने पांचाराम रिठाडीया यांनी 13 ऑक्टोबरला टिळकनगर येथे लोकलखाली उडी मारून आत्महत्या केली होती. जेव्हा त्यांची अंतयात्रा निघाली तेव्हा या अंत्ययात्रेत पाच हजार पेक्षा जास्त जमाव सहभागी झाला होता. या वेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक आणि रस्ता रोको केला होता.

या प्रकरणात रिठाडिया कुटुंब न्यायालयात दाद मागण्यास गेले होते. तेव्हा पासून याचा तपास गुन्हे शाखा देखील करीत होती. गुन्हे शाखेने सायन रुग्णालयात चौकशी केली असता त्यांना मार्च महिन्यातील या बेवारस तरुणीच्या मृतदेहाची माहिती मिळाली होती. त्यांनी लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने केलेल्या तपासात या मुलीचा देखील मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र ही आत्महत्या, हत्या की अपघात होता हे मात्र स्पष्ट झालेले नाही. मात्र या मुळे आता पोलिसांच्या कारभारावर मात्र प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.