जालना : जालना विनयभंग प्रकरणातील पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  'एबीपी माझा'च्या बातमीनंतर अवघ्या दोन तासात पोलिसांनी कारवाई केली आहे. विनयभंग करुन मारहाण केल्याचा तालुका गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आतीश अण्णा खंदारे, सुशील साहेबराव वाघ, कारभारी रामभाऊ वाघ, विशाल कुटे अशी आरोपींची नाव आहे. ज्या आरोपीने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला तो अल्पवयीन असून  त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एका प्रेमी युगुलाला टोळक्याने मारहाण करुन मुलीचा विनयभंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. एकमेकांना भेटण्यासाठी आलेल्या या जोडप्याला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ आहे. दोन मुलं या जोडप्याला बेदम मारहाण करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर अन्य एक मुलगा मारहाणीची व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड करत आहे. हा व्हिडिओ जालना परिसरात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी सर्वात आधी एबीपी माझाने हा प्रकार उघड केल्यानंतर आता प्रशासनाकडून कारवाईला वेग आला आहे.

Couple Molested | जालन्यात प्रेमी युगुलाला मारहाण, तरुणीचा विनयभंग, महाराष्ट्रात सुन्न करणारी घटना



महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना : सुप्रिया सुळे
या प्रकरणानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'ही घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. सगळ्यांना विनंती हा व्हिडीओ फॉरवर्ड करू नका', असे आवाहन त्यांनी सुप्रिया सुळे यांनी केले आहे . तसेच ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर आणि व्हिडिओ काढणाऱ्यांवर कारवाई करण्याची गृह खात्याला विनंती त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून दखल

एबीपी माझाच्या या बातमीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या संसदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली. तर दुसरीकडे जालना पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी दोन पथकांची स्थापना केली आहे.

भाषण नको, कारवाई हवी : चित्रा वाघ

पोलिसांना एबीपी माझ्याच्या माध्यमातून ही बातमी समजत असेल तर पोलीस काय करत आहेत. पोलीस अधीक्षक जर अनभिज्ञ असतील तर त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. राज्य सरकारवर यावर काय भूमिका घेत आहे हे आम्हाला कळायला हवं. आम्हाला फक्त भाषणं नको तर कारवाई हवी, अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

संबंधित  बातम्या : 

महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना, प्रेमी युगुलाला मारहाण करुन तरुणीचा विनयभंग