जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील मनुमाता म्हणजेच मनुदेवी हे खान्देशातील जनतेचं श्रद्धास्थान आहे. यावलची मनुमाता खान्देशातील अनेकांची कुलदेवता आहे. त्याचप्रमाणे यावल परिसरातील गावांची ग्रामदेवता म्हणूनही प्रसिद्ध आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरकुशीमध्ये अतिशय निसर्ग रम्य परिसरात मनुदेवीचं मंदिर आहे.


देवीच्या दर्शनासोबतच पर्यटनाचा आनंद

या ठिकाणी देवीच्या दर्शनासोबत नदी, नाले, तलाव, धबधबा आणि वन्य प्राण्यांनी समृद्ध जंगल असल्याने पर्यटनाचा आनंद देखील मिळतो. त्यामुळे राज्यभरातून भाविक दर्शनासोबत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात.

मनुमातेच्या दर्शनाला येणारे भक्त सर्वधर्म समभावाचे हे उत्तम उदाहरण आहे. सर्वच जाती धर्माचे लोक या ठिकाणी मनुमातेच्या दर्शनाला येतात.

नवसाला पावणारी यावलची मनुमाता

देवीच्या दर्शनासोबत अनेकजण मनोकामना पूर्ण होण्याचा नवस बोलण्यासाठी येतात, तर काही जण आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यावर नवस फेडण्यासाठी सहकुटुंब या ठिकाणी येत असतात. देवीला पाच नारळ, साडीचोळी, आणि भंडारा अर्पण करुन भक्त आपला नवस पूर्ण करतात.

मनुदेवीची यात्रा

नवरात्रीसह चैत्र शुद्ध पौर्णिमेला यावलमध्ये मनुदेवीची यात्रा भरते. यात्रेच्या काळात देवीच्या  विधीवत पुजेसह होम-हवन आणि नवचंडी यज्ञाचे आयोजन मनुदेवी ट्रस्टतर्फे करण्यात येतं.

मनुमातेची आख्यायिका

12व्या ते 13व्या शतकात राजा अहिरसेन याने मनुदेवीला आपले कुलदैवत मानून तिची स्थापना केल्याची आख्यायिका आहे. काहींच्या मते राजा इंद्रसेन याने हे मंदिर उभारले आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी देखील नंतरच्या काळात या मंदिरामध्ये सुधारणा केल्याचं बोललं जातं.

मनुमातेचं मंदिर हेमाडपंथी शैलीचं

अतिशय पुरातनकालीन हेमाडपंथी शैलीचं मनुमातेचं मंदिर यावलमध्ये आहे. 1991 मध्ये सातपुडा निवासिनी मनुदेवी प्रतिष्ठान आणि आडगाव येथील काही ग्रामस्थांनी या ठिकाणाच्या विकासाची जबाबदारी स्वीकारली. यात्राकाळात लाखो भाविकांच्या देवीच्या दर्शनासाठी येतात. यावेळी मंदिरापर्यंत जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात येते.

पाहा व्हिडीओ :