सांगली: सांगली जिल्ह्यात अनेक धार्मिक, ऐतिहासिक, आणि पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे  येथे पर्यटकांसोबतच विविध ग्रामदेवतांच्या जत्रांनिमित्त भाविकांची गर्दी असते. सांगली जिह्यातील जत, कवठेमहंकाळ आदी दुष्काळी भागातील अनेक प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य पर्यटन स्थळे या भागाचे वेगळेपण वाढवतात. असेच एक जिल्ह्यातील कवठेमहांकाळचे श्री महांकाली देवीचे मंदिर. या मंदिराला 450 वर्षांची परंपरा असल्याचे येथील ग्रास्थ सांगतात.


वास्तविक, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ हा तसा दुष्काळी तालुका. पण याच भागात श्री महांकाली देवीचे जागृत देवस्थान साऱ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. अंबाबाई या नावाने देखील या देवीला ओळखलं जातं. या देवीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारत देशाची ओळख श्रीरामाचे बंधू भरत यांच्यापासून असल्याचे सांगितले जाते. तसेच कवठेमहांकाळ या गावाची ओळख या महाकाली देवीच्या आणि या गावातून वाहणाऱ्या कुमंडलू नदीच्या नावावरून ओळखल्याचे सांगितले जाते. महाकालीचे हे मंदिर शहराच्या मध्यभागी असून देवीच्या आशीर्वादानेच तालुक्यचा विकास होत असल्याची लोकांची धारणा आहे.

देवस्थानची महती

1550 ते 1600 च्या दरम्यान कवठेमहांकाळमधून वाहणाऱ्या कुमंडलू नदीत अंबिका कुंड होता. या कुंडात धनगर समाजाचा बांधव आंघोळ करत असताना त्याला श्री महांकाली देवीची  मूर्ती सापडली. त्या देवीच्या पूजेचे सोपस्कार नियमित करण्या जमत नसल्याने, त्याने देवीची मूर्ती गावच्या पाटलांकडे दिली. पाटलांनी गावकऱ्यांच्या सोबतीने या मूर्तीची नदीकाठावरच प्रतिष्ठापना करुन तिची पूजाअर्चा सुरु केली. तेव्हापासून आजतागायत गावातील सर्वजाती धर्माचे लोक या देवीची सेवा करतात.

अलीकडेच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. याकामी अनेक लोकांनी सढळ हस्ते मदत केली. देवीच्या नावाने या दुष्काळी भागात चालवल्या जाणाऱ्या श्री महांकाली सहकारी साखर कारखान्यानेही या जीर्णोद्धाराच्या कामात मोठा हातभार लावला. यावेळी संपूर्ण मंदिराला आतून-बाहेरुन मार्बल फरशा बसवण्यात आल्या.

मंदिराची वैशिष्ट्ये

या मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारावरील सागवानी लाकडावरचे नक्षीकाम सर्वांचेच लक्ष वेधून घेते. तसेच श्री महांकाली देवीची अलंकारांनी मढवलेली पूजा पाहून मन प्रसन्न होते. याशिवाय देवीच्या गाभाऱ्यामध्येच महादेवाची पिंड आहे. यामुळे शिव-शक्तीचा संगम असलेले  मंदिर हे या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

मंदिरातील उत्सव

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध दशमी (दसरा) असा देवीचा उत्सव साजरा केला जातो. शिवाय नवरात्रोत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रींमध्ये पहाटेची काकड आरतीपासून विविध पूजा, आणि धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात. दुपारच्या वेळेस कीर्तन, भजनाचेही आयोजन केले जाते. यामध्ये पोत खेळणे, धनगरी ओव्या, गोंधळी गीते आदी कार्यक्रमांसाठी भक्तांची मोठी गर्दी होते. तसेच दसऱ्यादिवशी देवीची पालखी सोने लुटण्यासाठी पालखी पळवत नेली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी तालुक्यातून लोक मोठी गर्दी करतात.

सर्व जातीतील बांधवांचे मानपान

हा उत्सव गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन साजरा करतात. यामध्ये भोंगाळे समाज, माळी, तेली, गोंधळी, चांभार, रामोशी समाजातील बांधव देवीच्या या उत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. गावच्या पाटील मंडळींना देवीला वारा घालण्याचा मान असो, तर माळी समाजाकडे पालखी वाहण्याचा मान असतो. प्रत्येक समाज या देवीचा मानकरी असून वर्षानुवर्षे येणाऱ्या पिढ्या हा देवीची पूजा भक्तिभावाने करताना दिसतात.

देवीच्या या उत्सव काळात बाहेर असलेले लोक आवर्जून गावी येतात. गावातील व्यापारी देवीचे दर्शन घेऊनच आपल्या कामास सुरवात करतो. जागृत देवस्थान असल्याने सर्वांचीच या देवीवर अफाट श्रद्धा असल्याचे पाहायला मिळते.

व्हिडीओ पाहा