अमरावती: अमरावती जिल्ह्यातील नेर येथील पिंगळा देवीचा महिमा दूरवर पसरला आहे. ही देवी विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ही देवी माहूरच्या रेणुका मातेचं प्रतिरूप आहे. या मंदिराची स्थापना केव्हा आणि कशी झाली याचा इतिहास कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे पिंगळा देवी हे स्वयंभू शक्तीपीठ असल्याची भक्ताची भावना आहे.
अमरावती शहारापासून सुमारे ३५ किमी अंतरावर असलेल्या एका टेकडीवर हे सुंदर मंदिर आहे. या भागात प्राचीन हेमाडपंथी शैलीचं बांधकाम असलेलं हे मंदिर ५०० ते ६०० वर्षापूर्वीचं असल्याचं समजतं. या मंदिरात माहूरच्या रेणुका देवीचा प्रतिरूप असलेला मुखवटा विराजमान आहे. या मूर्तीचा फक्त चेहरा वर असून पूर्ण शरीर हे जमीनमध्ये आहे. तसंच या मूर्तीच्या खाली विहीर असून या विहिरीतून ही स्वयंभू मूर्ती निघाली असल्याचे म्हटलं जातं.
अमरावतीसह संपूर्ण विदर्भात लाखोंच्या संख्येने भाविक येथे दर्शनसाठी येतात. विदर्भातील लेको भाविकांची ही कुलदेवीसुद्धा आहे. पिंगळा देवी ही जागृत देवस्थान असून नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे.
भाविकांची श्रद्धास्थान असलेली पिंगळा देवी नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे. आपण कुठल्याही अडचणीमध्ये असल्यास या देवीचे नामस्मरण केल्यास त्यातून मार्ग सुकर होतात. आईप्रमाणे ही देवी आपल्या पाठीशी उभी राहत असल्याचं येथील भाविक सांगतात.
आदी शक्ती देवीच्या वेगवेगळ्या रूपातील सात स्थानांपैकी पिंगळाई देवी हे एक मानाचं स्थान आहे. माहूरच्या रेणुका देवीच्या दिनचर्येप्रमाणेच या देवीची दिनचर्या असल्याची माहिती येथील पुजारी सांगता.
दर मंगळवारी आणि शुक्रवारी या गडावर भाविकांची मोठी गर्दी होते तर वर्षातून एकदा चैत्र महिन्यात व नवरात्रीत देवीच्या गडावर मोठी यात्रा भरते.